शेवगाव येथे पार पडलेल्या देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये पटकावले अजिंक्यपद
पारनेर/ प्रतनिधी,
पारनेर येथील शिव छत्रपती कुस्ती संकुलाचा मल्ल चेतन रेपाळे याने शेवगाव येथे पार पडलेल्या देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये पुणे येथील कौतुक डफडे याचा दोन गुणांनी पराभव करून अजिंक्यपद पटकावले. त्यानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, पारनेर तालुका यांच्यावतीने त्याचा सत्कार व सन्मान करण्यात आला. यावेळी डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड, पारनेर तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास शिंदे, तालुका सचिव लतिफ राजे, शहराध्यक्ष भगवान गायकवाड, कुस्ती संकुलनाचे संचालक युवराज पठारे, निघोजचे सरपंच सचिन वराळ, भाजपा कार्यकर्ते किरण कोकाटे, मनसे नेते सतीश म्हस्के आदी यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना सचिन वराळ म्हणाले की, पारनेर सारख्या ग्रामीण भागातील मल्ल राज्यस्तरीय केसरी स्पर्धेमध्ये अजिंक्यपद पटकावत असेल तर हि गोष्ट अभिमानास्पद आहे. शिव छत्रपती क्रीडा संकुलासाठी येणारा भविष्यकाळ हा उज्वल आहे. लतिफ राजे म्हणाले की, शिव छत्रपती क्रीडा संकुलाचे संचालक व नगरसेवक युवराज पठारे यांच्या मार्गदर्शनामध्ये दिवसेदिवस उत्कृष्ट कामगिरीचा आलेख चढता आहे. या ठिकाणी मल्लांसाठी सर्व भौतिक सुविधा असून अनुभवी कोच या ठिकाणी मार्गदर्शन करत आहेत त्यामुळे भविष्यामधील येथील मल्ल आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये खेळताना दिसतील.
युवराज पठारे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, या कुस्ती संकुलातील सर्व मल्लांसाठी लष्करातील सेवानिवृत्त क्रीडा मार्गदर्शक तसेच इतर कोच आहेत. हे कुस्ती संकुल जिल्ह्यातील एक मोठे संकुल आहे. याप्रसंगी डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड व युवा नेतृत्व सचिन वराळ यांचा वाढदिवसानिमित्त सन्मान व गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण कोकाटे यांनी केले.




