अहिल्यानगर / भगवान गायकवाड,

शहराच्या इतिहासाचे जतन करणारे आणि शहरावर जीवापाड प्रेम करणारे ज्येष्ठ अभ्यासक, ‘रेडिओ नगर ९०.४ एफएम’चे संचालक भूषण गोपाळ देशमुख यांचे आज, ६ जून २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे अहिल्यानगरने एक खंदा इतिहासकार आणि सांस्कृतिक वारसा जपणारं व्यक्तिमत्त्व गमावलं आहे.भूषण देशमुख हे केवळ एक अभ्यासक नव्हते, तर ते नगरच्या मातीशी नाळ जोडलेले एक जिवंत कोश होते. निजामी इतिहासाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. या इतिहासाची माहिती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी, या हेतूने त्यांनी गेली अनेक वर्षे सातत्याने ‘हेरिटेज वॉक’ उपक्रम चालवला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नागरिकांना, विशेषतः तरुणांना नगरच्या वैभवशाली इतिहासाची ओळख झाली. शहराच्या जुन्या वास्तू आणि ऐतिहासिक घटनांवर त्यांचे भाष्य अत्यंत प्रभावी असे.
संस्कृती आणि माहितीच्या प्रसारासाठी त्यांनी रेडिओ माध्यमाचा प्रभावी वापर केला. ‘स्नेहालया’च्या ९०.४ एफएम रेडिओचे संचालक म्हणून त्यांनी अनेक शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम यशस्वीपणे राबवले. त्यांच्या आवाजात आणि शैलीत नगरची संस्कृती आजही अनेकांच्या कानात गुंजत आहे. त्यांच्या जाण्याने नगरच्या सांस्कृतिक विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून, शहराचा एक चालता-बोलता ऐतिहासिक ठेवा आज आपण गमावला आहे.
भूषण देशमुख यांच्या निधनाची बातमी समजताच शहरातील साहित्य, कला आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या चाहत्यांसाठी आणि मित्रपरिवारासाठी त्यांचे पार्थिव आज रेडिओ नगर, लेंडकर मळा, बालिकाश्रम रस्ता येथे दुपारी ३ ते ५:३० या वेळेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर, सायंकाळी ६ वाजता अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.स्नेहालय परिवार आणि गिरीश कुलकर्णी यांनी या कठीण काळात त्यांच्या परिवाराप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. 

भावपूर्ण श्रद्धांजली….
एक ऋजू आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याने अहिल्यानगर शहर हळहळले आहे.
       गिरीश कुलकर्णी 
स्नेहालय परिवार. अहिल्यानगर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *