निघोज / आनंद भुकन,
काल रात्री १ ते १:३० च्या सुमारास निघोज येथील तळे माळ वस्तीवर राहणारे निलेश भगवान भुकन यांच्या ४० x २५ फूट आकाराच्या गोठ्याला अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत निलेश यांची अंदाजे १५ ते २० लाख रुपये किमतीची उच्च प्रतीची बैल जोडी जखमी झाली, तसेच इतर जनावरे वाचवण्यात यश आले. आग लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी माणसांनाही जखमी करण्याचा प्रयत्न केला. बैलांचा आवाज ऐकून निलेश यांनी धाव घेत जनावरांची दोर सोडताना त्यांच्या डोक्याला जखमा झाल्या. आग लावणाऱ्यांना त्यांनी पळताना पाहिले, परंतु प्रथम जनावरे वाचवण्याला प्राधान्य दिले.
आज सकाळी ग्रामस्थांनी एकत्र येऊन या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. गाडामालक संघटनेनेही या कृत्याचा जाहीर निषेध केला. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पंचनामा करण्यात आला. यावेळी ग्रामसेवक संजय पवार, तलाठी भाऊसाहेब दत्तात्रय काळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रशांत दिनकर, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी कडूस, प्रकाश बोबडे, गणेश डोंगरे उपस्थित होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. गुंड यांनी जखमी बैलांवर औषधोपचार केले.
या घटनेच्या पाहणीसाठी गावचे उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे, ग्रामपंचायत सदस्य सुधामती कवाद, विठ्ठल कवाद, शिवबा संघटनेचे अनिल शेटे, शांताराम कवाद, पैलवान वराळ, भीमा लामखडे यांच्यासह अनिकेत भुकन, सुधीर भुकन, शरद भुकन, सागर आनंत, दत्तात्रय भुकन आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ पत्रकार दत्तजी उनवणे, सुरेश खोषे, सागर आतकर, मंगेश वराळ आणि आनंद भुकन यांनीही घटनास्थळी भेट दिली.
ही घटना गावात तणावाचे वातावरण निर्माण करणारी ठरली असून, अज्ञात आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.





