पारनेर तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण

पारनेर / प्रतिनिधी, 

        आदर्शगाव हिवरे बाजारच्या जडणघडणीत प्रसार माध्यमांचे मोठे योगदान आहे.प्रसार माध्यमांनी आम्हाला प्रोत्साहन दिले असे गौरवोद्गार पद्मश्री पोपटराव पवार यांनी काढले.
           संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा ७२५ वा संजीवन समाधी सोहळा,संत तुकाराम महाराजांचा ३७५ वा वैकुंठगमन सोहळा,छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळा, अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीची त्रिशताब्दी,स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाचे औचित्य साधत व अहिल्यानगर जिल्ह्यातील ५१ शूर शहीद जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ हिवरे बाजार परिवाराने मातृस्मृती वनमंदिराची उभारणी केली आहे.या वनमंदिरात ५ जून ते ५ जुलै दरम्यान तब्बल १ हजार ८७६ दुर्मिळ,देशी वृक्षांचे रोपण करण्यात येत आहे.गुरूवारी ,३ जुलै रोजी पारनेर तालुका पत्रकार संघाचे सदस्य व कुटुंबियांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी पवार बोलत होते.
         पारनेर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे, अध्यक्ष उदय शेरकर,कार्याध्यक्ष दत्ता उनवणे,मार्तंड बुचुडे,पारनेर दर्शनचे संपादक देवीदास अबूज, बबनराव गायखे,केशव चेमटे,विनोद गोळे, सतीश रासकर,संपत कपाळे, सुरेंद्र शिंदे,दादा भालेकर, योगेश खाडे उपस्थित होते.
      पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले की,३५ वर्षांपूर्वी,२६ जानेवारी १९९० रोजी हिवरे बाजारच्या ग्रामस्थांनी श्रमयज्ञाला सुरूवात केली.सुरूवातीला ज्ञान मंदिर आणि वन मंदिराचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला.श्रमदान व लोकवर्गणीतून गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी (ज्ञान मंदिर) पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.पर्यावरण संवर्धन व त्यातून गावाच्या विकासासाठी दरवर्षी शाश्वत उत्पन्न मिळावे यासाठी चिंचेच्या १ हजार रोपांची लागवड करण्यात आली.ग्रामस्थांच्या प्रयत्नांतून ज्ञान मंदिराचा विकास झाला.शिक्षकांच्या प्रयत्नांतून शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावला.पंचक्रोशीतील पालकांनी आपल्या पाल्यांचा हिवरे बाजारच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला.अपवाद वगळता आज गावातील व पंचक्रोशीतील विद्यार्थी मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेत आहेत.असे पवार म्हणाले.
        एका बाजूला ज्ञान मंदिर विकसित होत असताना वन मंदिराच्या विकासात अपेक्षित यश मिळत नव्हते.सुरूवातीला लागवड करण्यात आलेल्या चिंचेच्या झाडांचा प्रयोग अयशस्वी ठरला.मात्र ग्रामस्थांनी हार मानली नाही.गावाच्या पूर्वेकडील डोंगरावर श्रमदानातून पाणलोट क्षेत्र विकासाचे काम सुरू करण्यात आले.सलग समतल चर,गॉबियन बंधारे, नालाबांधांच्या माध्यमातून पाणलोट क्षेत्र विकसित करण्यात आले.उजाड डोंगर उतारावर मोठ्या प्रमाणावर देशी,औषधी झाडे लावण्यात आली.या प्रयोगाला मोठे यश आले.गेल्या तीन तपांच्या,३५ वर्षांच्या अविरत श्रमयज्ञातून हिवरेबाजारमध्ये मोठे काम उभे राहिले.जमिनीचे आरोग्य सुधारले. ग्रामस्थांचा आर्थिक स्तर उंचावला.या संपूर्ण प्रवासात राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक व्यक्ती, प्रशासकीय अधिकारी, प्रशासकीय यंत्रणा, प्रसार माध्यमे यांचे मोलाचे योगदान मिळाले असल्याचे पवार यांनी नमूद केले.


🔶🔶🔶🔶🔶
श्रमदानात महिलांचे मोठे योगदान

हिवरे बाजारच्या श्रमयज्ञात गावातील महिलांचे योगदान मोठे आहे.डोंगर उतारावरील झाडांना महिलांनी डोक्यावरून पाणी घातले याचा पवारांनी आवर्जून उल्लेख केला.महिला शक्तीचा सन्मान करण्यासाठी सुचिता वाघमारे,सुरेखा आबुज, ज्योती शेरकर, ज्योती गोळे, सुनिता रासकर, मीना कपाळे यांच्या हस्ते मातृस्मृती वनमंदिरात वृक्षारोपण करण्यात आले.त्यांचा हिवरे बाजारच्या सरपंच विमल ठाणगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.छबुराव ठाणगे, एस.टी. पादीर सर ,विलास गोसावी, रोहिदास पादीर यावेळी उपस्थित होते.


🔶🔶🔶🔶🔶🔶
आदर्श टिकवून ठेवणे सोपे काम नाही !

पद्मश्री पोपटराव पवार आणि हिवरे बाजारच्या ग्रामस्थांनी तीन तपांपूर्वी संपूर्ण देश, राज्यासमोर आदर्श निर्माण केला.एखादे आदर्शवत काम करणे, आदर्श निर्माण करणे एकवेळ सोपे आहे.मात्र सलग तीन तपे आदर्श टिकवून ठेवणे हे सोपे काम नाही.आदर्श टिकविण्याचे शिवधनुष्य हिवरे बाजारच्या ग्रामस्थांनी लिलया पेलले आहे.पद्मश्री पोपटराव पवार यांचे पारनेर तालुका पत्रकार संघावर व संघाच्या सदस्यांवर विशेष प्रेम आहे.त्यांनी पत्रकार संघाच्या सदस्यांच्या हस्ते वृक्षारोपण केले.हा पत्रकार संघाचा सन्मान आहे.
– संजय वाघमारे
संस्थापक अध्यक्ष पारनेर तालुका पत्रकार संघ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *