अहिल्यानगर : पत्रकार सुशील थोरात यांच्यावर प्राणघातक हल्ला करून पसार झालेल्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.
20 ऑगस्ट रोजी सुशील मारूतराव थोरात यांच्या कारला सोनू कोहक याच्या मोपेडची धडक झाली होती. तसेच थोरात यांनी आरोपींच्या विरोधात बातम्या प्रसिद्ध केल्याच्या कारणावरून सोनू कोहक, पप्पू मते, विकी ढवण, प्रशांत निक्रड आणि एका अनोळखी व्यक्तीने थोरात व त्यांच्या मुलास लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. यावेळी थोरात यांना खाली पाडून डोक्यात व पाठीवर दगडाने मारहाण करण्यात आली तसेच गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 717/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करण्यात आली. या पथकांनी राजगुरुनगर व पुणे शहर परिसरात आरोपींचा शोध घेतला; मात्र आरोपी तेथून पसार झाले होते.
दरम्यान, 24 ऑगस्ट रोजी मुख्य आरोपी हेमंत उर्फ सोनू दत्तात्रय कोहक हा साथीदारांसह छत्रपती संभाजीनगरमधील वाळूंज एमआयडीसी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून हेमंत उर्फ सोनू दत्तात्रय कोहक (27), महेश उर्फ पप्पू दशरथ मते (27) आणि प्रशांत शिवाजी निक्रड (25) या तिघांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी केलेल्या अधिक चौकशीत आरोपींनी पत्रकार सुशील थोरात व त्यांच्या मुलास मारहाण केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. ताब्यात घेतलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी तोफखाना पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.
दोन आरोपी सराईत गुन्हेगार….
पोलिसांच्या माहितीनुसार, ताब्यातील आरोपींपैकी हेमंत उर्फ सोनू कोहक याच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात 2022 मध्ये भादंवि कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल आहे. तर प्रशांत निक्रड याच्यावर 2025 मध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम 118(1) अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.




