अहिल्यानगर / भगवान गायकवाड,
सामाजिक ऋणातून उतराई होण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर खेळाचा आनंद आणि विरंगुळा फुलवणारा क्षण म्हणजे स्नेहालय प्रीमियर लीग (SPL). या बहुप्रतीक्षित स्पर्धेच्या चौथ्या पर्वाचा (SPL-२०२६) उद्घाटन सोहळा शनिवार, १७ जानेवारी २०२६ रोजी स्नेहालय पुनर्वसन संकुल, MIDC येथे अत्यंत उत्साही आणि भारावलेल्या वातावरणात पार पडला.शनिवारी सकाळी ९ वाजता रोटरी क्लबच्या मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे रितसर उद्घाटन करण्यात आले. यावेळी मा. ईश्वर अशोक बोरा (सहाय्यक प्रांतपाल, रोटरी जिल्हा ३१३३), मा. सुनील कटारिया (अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर सेंट्रल) आणि मा. अमर गुरप (सचिव) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
व्यासपीठावर स्नेहालयच्या अध्यक्षा मा. जयाताई जोगदंड, मा. संजय बंदिष्टी, अॅड. मा. श्याम असावा, मा. कांचन पापडेजा, कार्याध्यक्ष मा. अनिल गावडे, संचालक मा. हनीफ शेख आणि प्रवीण मुत्याल यांची विशेष उपस्थिती होती.
उद्घाटनप्रसंगी बोलताना मा. ईश्वर बोरा यांनी कार्यकर्त्यांच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, स्नेहालयचे कार्य केवळ सेवाभावी नाही, तर ते माणुसकीची पेरणी करणारे आहे. खेळाच्या मैदानावर निर्माण होणारी संघभावना कार्यकर्त्यांना मानसिक बळ देते आणि हेच नाते समाजाशी अधिक घट्ट होण्यास मदत करते.”
रोटरी क्लबचे सुनील कटारिया आणि अमर गुरप यांनी स्नेहालयचा उल्लेख एक ‘मोठे कुटुंब’ असा केला. मैदानावर खेळाडूवृत्तीने वावरणारे सदस्य पाहून त्यांनी संस्थेच्या शिस्तीचे आणि प्रेमाचे कौतुक केले.स्नेहालयच्या अध्यक्षा मा. जयाताई जोगदंड यांनी यावेळी अत्यंत भावूक उद्गार काढले. त्या म्हणाल्या, “आमचे कार्यकर्ते दिवस-रात्र दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश आणण्यासाठी कष्ट करतात. त्यांच्या स्वतःच्या आनंदासाठी, आरोग्यासाठी आणि मानसिक स्वास्थ्यासाठी SPL हा केवळ खेळ नसून आमच्या एकजुटीचा उत्सव आहे.” स्नेहालयच्या विविध प्रकल्पांतील कर्मचारी, स्वयंसेवक आणि कार्यकर्ते या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.केवळ क्रिकेट खेळणे हा उद्देश नसून, एकमेकांमधील विश्वास, समज आणि सहकार्य वाढवणे हा मुख्य हेतू आहे. मैदानावर विजयाचा जल्लोष आणि पराभवाचा खिलाडूवृत्तीने केलेला स्वीकार, हे स्नेहालयच्या मूल्यांचे दर्शन घडवत होते.
माणुसकी बळकट करणारा अनुभव…
या स्पर्धेच्या निमित्ताने स्नेहालय परिवारातील सर्व प्रकल्पप्रमुख आणि कर्मचारी मोठ्या संख्येने एकत्र आले आहेत. SPL-२०२६ ही स्पर्धा खऱ्या अर्थाने “खेळाच्या मैदानातून माणुसकी बळकट करणारी” ठरत आहे. दैनंदिन कामाच्या ताणतणावातून मुक्त होऊन, खिलाडूवृत्तीने एकत्र येण्याचा हा उपक्रम स्नेहालय परिवाराच्या भावनिक नात्यांना नवी ऊर्जा देणारा ठरला आहे.






