निघोज / सौ.निलम खोसे पाटील,
शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, कांदा भाववाढ, निर्यात धोरण आणि इतर शेतीप्रश्नांसाठी ‘आपली माती, आपली माणसं’ या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष रुपेश ढवण बुधवार, दि. २० ऑगस्टपासून निघोज येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत. युवा शेतकरी नेते ढवण यांनी नुकतेच यशस्वी अन्नत्याग आंदोलन केले, ज्याला राज्यभरातील शेतकरी आणि वारकऱ्यांनी भरघोस पाठिंबा दिला. या आंदोलनामुळे महायुतीने विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, परंतु वर्ष उलटूनही ते पूर्ण झालेले नाही.
ढवण यांनी कांदा निर्यात खुली करणे, बांगलादेशसह इतर देशांमध्ये कांदा निर्यातीला चालना देणे आणि शेतीमालाला हमीभाव मिळावा, यासाठी हे आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांच्यासमवेत महेंद्र पांढरकर, देवराम लामखडे, पोपट तनपुरे, कचरू वरखडे, बाबाजी पठारे, दादा वराळ, संतोष लामखडे, संजय तनपुरे, अशोक शेटे, राजेंद्र वाळुंज, सोनी ताई पवार, नंदाबाई वरखडे, साखराबाई वरखडे, हिराबाई वराळ, बबिता काळे, शोभा ढवळे आणि इतर शेतकरी साखळी उपोषणात सहभागी होणार आहेत.
दि. २० ते २९ ऑगस्ट दरम्यान, दररोज सायंकाळी ६ ते ७:१५ या वेळेत हभप अशोक कानडे महाराज, हभप तुषार गुंड, हभप धनंजय गोरडे, हभप बाळासाहेब पठारे, हभप सर्जेराव मस्कर, हभप बाबा खामकर, हभप श्रीराम घुले, हभप पोपट तनपुरे आणि हभप श्रीहरी पवार महाराज यांचे हरी प्रवचन होणार आहे. याशिवाय, विविध गावातील भजनी मंडळांचे भजनांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. रात्री ७:३० ते ८:३० या वेळेत शेतकऱ्यांच्या सहभागातून महाप्रसादाचे आयोजन होईल.
रुपेश ढवण यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न तडीस जाईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या उपोषणाला शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा मिळण्याची अपेक्षा आहे.





