पारनेर / भगवान गायकवाड,
स्नेहालय संस्थेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील निवडक विद्यार्थी आणि शिक्षक यांना ग्वाल्हेर ( मध्य प्रदेश येथील ) भारतातील नामांकित आणि अग्रगण्य सिंधिया विद्यालयाने शैक्षणिक भेटीसाठी निमंत्रित केले आहे. येथील एक आठवड्याच्या वास्तव्यात सिंधिया विद्यालयातील विविध शैक्षणिक प्रकल्पांना भेटी, येथील विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद तसेच ग्वाल्हेरचे राजे श्रीमंत ज्योतिरादित्य सिंधिया ( शिंदे )महाराज यांच्याशी संवाद अहिल्यानगरचे विद्यार्थी करणार असल्याची माहिती प्राचार्य शितल गुंदेचा यांनी दिली.
दिनांक 21 ते 27 जानेवारी 2026 या कालावधीत आयोजिलेल्या या प्रकल्प भेटीत 5 शिक्षक 10 विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
सिंधिया स्कूलचे माजी विद्यार्थी असलेले स्नेहालय संस्थेचे विश्वस्त राजीव कुमार सिंग यांनी या भेटीचे आयोजन करण्यात पुढाकार घेतला. श्री. राजीव कुमार यांनी सांगितले की, या भेटीचे मुख्य उद्दिष्ट अहिल्यानगर मधील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील नामांकित शिक्षणसंस्थेतील शिक्षणपद्धती, शिस्तबद्ध जीवनशैली, ऐतिहासिक वारसा तसेच सांस्कृतिक मूल्यांची प्रत्यक्ष ओळख करून देण्याचा आहे.
या शैक्षणिक दौर्यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना मिळणार आहे. देशातील सर्वात जुन्या निवासी आणि नामांकित विद्यालयांपैकी एक असलेल्या
सिंधिया स्कूलची शैक्षणिक रचना, वसतिगृह व्यवस्था, क्रीडा सुविधा, हाऊस संस्कृती ,ग्रंथालय , विविध सहशालेय उपक्रमांची माहिती अहिल्यानगरचे विद्यार्थी करून घेतील.
दोन्ही शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये संवाद आणि मित्रता विकसित होणार आहे. स्नेहालय चे विद्यार्थी सिंधिया स्कूल च्या रंगमंचावर विविध गुणदर्शनच्या प्रदर्शनातून महाराष्ट्राची संस्कृती सादर करणार आहेत .
स्नेहालयचे प्रमुख पालक आणि मार्गदर्शक राजीव गुजर यांनी सांगितले की, सिंधिया स्कूलचे 150 विद्यार्थी मागील 2 वर्षांपासून नियमितपणे स्नेहालय संस्थेच्या प्रकल्प भेटीस अहिल्यानगर मध्ये येतात . येथे क्रीडा तसेच सांस्कृतिक उपक्रमांचे सादरीकरण करतात. तसेच श्रमदानाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचे धडे घेत आहेत. स्नेहलय संस्थेच्या मानसग्राम प्रकल्पात स्वच्छता, वृक्षारोपण आणि बांधकामात येथील विद्यार्थ्यांनी योगदान दिले आहे.
अहिल्यानगर मधील प्रसिद्ध उद्योजक अभय फिरोदिया , अजित नवनीतदास बार्शीकर इ. सिंधिया शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. याशिवाय देशाच्या प्रशासन, लष्कर, प्रसिद्धी माध्यमे , सामाजिक आणि राजकीय प्रक्रिया , न्यायदाना इ.क्षेत्रातील अनेक समर्पित व्यक्तिमत्व या विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. अशाप्रकारे देशातील नामांकित शिक्षण संस्थांशी स्नेहालय नाते विकसित करीत असल्याचे संस्थेच्या सचीव डॉ. प्रीती भोंबे , संचालक हनिफ शेख , शाळेच्या मानद संचालिका कांचन पापडेजा यांनी सांगितले..





