*स्नेहालय उडान प्रकल्पाच्या समन्वयातून तात्काळ कारवाई; जागृतीमुळे वाढली तक्रारी*
अहिल्यानगर, कोपरगाव, दिनांक 18 एप्रिल 2026 –
जिल्ह्यात बालविवाहाच्या घटनांबाबत विविध वृत्तपत्रांमध्ये सातत्याने बातम्या प्रसिद्ध होत असून, काही ठिकाणी गुन्हे दाखल होण्याच्या घटनाही समोर येत आहेत. वरकरणी हे प्रमाण वाढत असल्याचे दिसत असले, तरी त्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे वाढलेली जागृती आहे. आता नागरिकांना बालविवाहाचे दुष्परिणाम समजू लागले असून, ते तात्काळ हेल्पलाईनवर माहिती देत असल्यामुळे अनेक प्रकरणे वेळेत उघड होत आहेत.
याच पार्श्वभूमीवर अक्षय तृतीया पूर्वसंध्येला कोपरगाव तालुक्यात एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींचे होणारे बालविवाह रोखण्यात यश आले. “साटा-लोटा” पद्धतीने हे विवाह आयोजित करण्यात आले होते. स्नेहालय संचलित उडान प्रकल्पाला मिळालेल्या माहितीनंतर तात्काळ संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्यात आला.
उडान प्रकल्पाच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसेवक (बालविवाह प्रतिबंधक अधिकारी), पोलीस पाटील आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी हस्तक्षेप करून दोन्ही विवाह थांबवले. कुटुंबीयांना समुपदेशन करून बालविवाहाचे कायदेशीर परिणाम तसेच मुलींच्या शिक्षण, आरोग्य आणि भवितव्यावर होणारे गंभीर परिणाम समजावून सांगण्यात आले. दोन्ही कुटुंबांचे लेखी जबाब नोंदवून पुढील कार्यवाहीसाठी प्रकरण बाल कल्याण समितीकडे वर्ग करण्यात आले आहे.
स्नेहालय उडान प्रकल्प मागील सात वर्षांपासून अक्षय तृतीया काळात विशेष सतर्कता ठेवून कार्यरत असून, कुठेही बालविवाह होत असल्याची माहिती मिळताच तात्काळ समन्वयातून हस्तक्षेप केला जातो. मागील 20 वर्षांपासून चाईल्ड हेल्पलाईन 1098 च्या माध्यमातूनही संस्थेने मोठ्या प्रमाणात बालविवाह रोखले आहेत.
बालविवाह हा बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006, पॉक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गंभीर गुन्हा आहे. यात सहभागी होणारे पालक, नातेवाईक, विवाह लावणारे, मदत करणारे किंवा समर्थन देणारे सर्वजण आरोपी ठरू शकतात. त्यामुळे “भावना” किंवा “परंपरा” या नावाखाली बालविवाह करणे कायद्याने मान्य नाही.
या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे—वेळेत मिळालेली माहिती दोन मुलींचे आयुष्य वाचवू शकते. त्यामुळे नागरिकांनी कुठेही बालविवाह होत असल्याची शंका जरी आली तरी ती लपवू नये.
📞 चाईल्ड हेल्पलाईन: 1098
📞 उडान हेल्पलाईन: 9011026495
तुमचा एक फोन एखाद्या मुलीचे संपूर्ण आयुष्य वाचवू शकतो.




