खासदार नीलेश लंके यांची माहिती

लाखो वारकऱ्यांसाठी अन्नदान, आरोग्यसेवा व विविध सुविधा

अहिल्यानगर  : प्रतिनिधी

             आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी खासदार नीलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाही सोलापूर जिल्ह्यातील परीते येथे भव्य अन्नछत्र व आरोग्य सेवा केंद्र उभारण्यात येणार आहे. नीलेश लंके प्रतिष्ठान आणि ‘आपला मावळा’ सामाजिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने १९ ते २२ जुलै या कालावधीत हा उपक्रम राबविण्यात येणार असून, चार दिवसांत सुमारे तीन ते चार लाख वारकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. यासंदर्भातील माहिती खासदार नीलेश लंके यांनी पत्रकार परिषदेत दिली.

          यंदा सलग पाचव्या वर्षी हा सेवाभावी उपक्रम राबविण्यात येत आहे. विठ्ठलभक्तांच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य देत अन्नदानाबरोबरच आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, चहा, नाश्ता आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. वारीच्या मार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला आवश्यक त्या क्षणी मदत मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे लंके यांनी सांगितले.

             वारकऱ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेत परीते येथे २५ ते ३० डॉक्टरांचे पथक, प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी आणि रुग्णवाहिका चारही दिवस कार्यरत राहणार आहेत. प्रवासादरम्यान उद्भवणाऱ्या विविध आरोग्य समस्यांवर तातडीने उपचार केले जाणार असून, कोरोना काळात आरोग्य व्यवस्थापनाचा मिळालेला अनुभव या सेवेत उपयोगी पडणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

           या संपूर्ण सेवायज्ञासाठी सुमारे ५०० स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत. अन्नपदार्थांचे वितरण, पाण्याची व्यवस्था, साहित्याची ने-आण, वारकऱ्यांना मार्गदर्शन, स्वच्छता, वाहतूक नियोजन अशा सर्व कामांची स्वतंत्र जबाबदारी स्वयंसेवकांवर सोपविण्यात आली आहे. विशेष म्हणजे अन्न तयार करण्याव्यतिरिक्त इतर कोणतेही काम कंत्राटदार किंवा केटरिंग व्यावसायिकांकडून करून घेतले जात नाही. प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि स्वयंसेवक स्वतः सर्व कामे निःस्वार्थपणे पार पाडतात. या सेवेकडे आम्ही कधीही राजकारण म्हणून पाहत नाही. येथे मी खासदार म्हणून नव्हे, तर वारकरी आणि त्यांच्या सेवकाच्या भूमिकेत सहभागी होतो. विठ्ठलभक्तांची सेवा करणे हेच आमच्यासाठी सर्वात मोठे भाग्य आहे, असे खासदार नीलेश लंके यांनी सांगितले.

           वारीदरम्यान होणाऱ्या अपघातांबाबत चिंता व्यक्त करताना त्यांनी वारी मार्गावर इतर वाहतुकीस पूर्ण बंदी घालण्याची गरज व्यक्त केली. वारीत सहभागी होणाऱ्या वाहनचालकांच्या परवान्यांची तपासणी, अल्पवयीनांकडून वाहन चालविण्याचे प्रकार रोखणे तसेच प्रत्येक वारकऱ्याचा शासनाने विमा उतरविणे आवश्यक असल्याची मागणी त्यांनी पुन्हा केली. यासंदर्भात गेल्या दोन वर्षांपासून शासनाशी सातत्याने पत्रव्यवहार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

           नाशिक ते पंढरपूर दिंडी मार्गाच्या उभारणीसाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत असून, २२ जुलैपासून सुरू होणाऱ्या लोकसभेच्या अधिवेशनात हा प्रश्न पुन्हा उपस्थित करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

           संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गावर अनेक सेवाकेंद्रे कार्यरत असतात. मात्र नाशिक, नगर आणि उत्तर महाराष्ट्रातून येणाऱ्या दिंड्यांच्या मार्गावर अशा सुविधांची संख्या तुलनेने कमी असल्याने परीते येथे सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे लंके यांनी सांगितले.

        यंदाच्या वारीतही सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि मानवतेचा संदेश जपत लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी नीलेश लंके प्रतिष्ठान आणि ‘आपला मावळा’ सामाजिक संघटना सज्ज झाली असून, सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *