पारनेर / भगवान गायकवाड,
भीषण उन्हाळ्याची चाहूल लागताच निसर्गातील ओढे, नाले आणि पाझर तलाव कोरडे पडू लागले आहेत. या कडक उन्हात मानवाप्रमाणेच मुक्या प्राण्यांचीही पाण्यासाठी वणवण होत आहे. हीच गरज ओळखून पारनेर तालुका पत्रकार संघाने सामाजिक बांधिलकी जपत ‘वन्यजीवांसाठी घोटभर पाणी’ हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.
सिद्धेश्वर रोड परिसरातील वनविभागाच्या क्षेत्रात असलेल्या पाणवठ्यांमध्ये पाणी सोडून वन्यजीवांना मोठा आधार देण्यात आला आहे. पारनेर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सिद्धेश्वर रोड परिसरातील वनविभागाच्या जंगलात हरिण, मोर, लांडोर, कोल्हे आणि विविध पशू पक्ष्यांचा मोठा वावर असतो. मात्र, वाढत्या तापमानामुळे या भागातील नैसर्गिक जलस्रोत आटले होते. वन्यजीवांचे पाण्यावाचून होणारे हाल थांबवण्यासाठी वैष्णवी पेट्रोल पंपचे व्यवस्थापक संभाजी मगर यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या विशेष योगदानातून पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात आले असून, वनविभागाच्या कोरड्या पडलेल्या पाणवठ्यांमध्ये हे पाणी सोडण्यात आले.यावेळी शिवराय सामाजिक प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा पत्रकार विनोद गोळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “केवळ बातम्या प्रसिद्ध करणे हेच पत्रकारांचे काम नसून, समाजातील आणि निसर्गातील घटकांप्रती जागरूक राहणे हे देखील आमचे कर्तव्य आहे. उन्हाळ्याच्या काळात पाणी टंचाईमुळे वन्यजीव नागरी वस्तीकडे वळतात, यात त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे हे पाणवठे भरून आम्ही एक छोटासा प्रयत्न केला आहे.
या सेवाभावी उपक्रमाच्या वेळी संभाजी मगर, कल्याण थोरात, बाळासाहेब शेटे, किरण सोनवणे, सचिन पठारे, भगवान नगरे, ईश्वर भोसले, भाऊसाहेब खेडेकर, राजू म्हस्के यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. पत्रकार संघाने राबवलेल्या या उपक्रमाचे पारनेर तालुक्यातून सर्वत्र कौतुक होत आहे.
🔶🔶🔶🔶🔶
पारनेर तालुक्यातील सामाजिक संस्थांनीही अशा प्रकारे वन्यजीवांसाठी पुढे यावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते भगवान गायकवाड यांनी केले आहे.
🔶🔶🔶🔶🔶🔶
उन्हाळ्याच्या तीव्रतेत वन्यजीवांना पाणी उपलब्ध करून देणे हे केवळ पुण्यकर्म नसून पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.
– पत्रकार विनोद गोळे.




