पारनेर / भगवान गायकवाड, 
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर शहराचे ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिर येथे परंपरेनुसार गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘व्हईक’ (वर्षभराचे पीक-पाणी भाकीत) वर्तवण्यात आले. या भाकितानुसार, आगामी वर्षात पाऊस बेताचा असला तरी धान्याचे उत्पादन मात्र समाधानकारक राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पारनेरमध्ये ही शेकडो वर्षांची परंपरा आजही श्रद्धेने जपली जाते. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी नागेश्वर मंदिरासमोर १४ खड्डे खोदले जातात. यामध्ये बारा महिन्यांचे १२ खड्डे आणि ‘श्वेतांबर’ व ‘राजांबर’ (राजांबर-प्रजांबर) मासांचे २ अतिरिक्त खड्डे असतात. या प्रत्येक खड्ड्यात वडाच्या पानावर विविध धान्ये ठेवून त्यावर पाणी ओतले जाते आणि खड्डे बुजवले जातात. पाडव्याच्या दिवशी सकाळी हे खड्डे उकरून, त्यातील पानांवरील धान्याचा ओलावा आणि स्थिती पाहून पावसाळ्याचा व पीक-पाण्याचा अंदाज ‘व्हईक’च्या रूपाने मांडला जातो.

गुरुवारी सकाळी मंदिरात पुजाऱ्यांच्या उपस्थितीत हे खड्डे उकरण्यात आले. यावेळी जाहीर करण्यात आलेल्या भाकितानुसार: पावसाचा जोर: ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, आश्विन, कार्तिक आणि पौष महिन्यात पाऊस ‘अधिक’ स्वरूपाचा असेल. तर चैत्र, वैशाख, भाद्रपद, मार्गशीर्ष आणि फाल्गुन महिन्यात पाऊस ‘बेताचा’ राहण्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे ‘अधिक मासात’ पावसाचे प्रमाण जास्त असेल. धान्य उत्पादन: वैशाख, मार्गशीर्ष आणि माघ महिन्यात धान्याचे उत्पादन ‘अधिक’ प्रमाणात मिळेल. इतर बहुतांश महिन्यांत धान्य उत्पादन ‘बराबर’ म्हणजेच सरासरी इतके राहील. राजांबर-प्रजांबर: राजांबर मासात पाऊस बेताचा पण धान्य अधिक, तर प्रजांबर मासात पाऊस आणि धान्य दोन्ही सरासरी (बराबर) राहतील. या सोहळ्याप्रसंगी भैरवनाथ पुजारी कृष्णा पुजारी, नागेश्वर मंदिराचे पुजारी योगेश वाघ, पोलीस पाटील बाळासाहेब औटी, विजय डोळ यांसह गावातील ज्येष्ठ नागरिक आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.शेतीवर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागासाठी हे भाकीत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या पारंपरिक अंदाजानुसार आता शेतकरी आपल्या पेरण्यांचे आणि शेतीकामांचे नियोजन करणार आहेत. निसर्गाचा समतोल राखला जाऊन बळीराजा सुखी व्हावा, अशी प्रार्थना यावेळी नागेश्वर चरणी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *