भाळवणी / लतिफ राजे,
भारतातील सार्वत्रिक निवडणूक ही आपल्या लोकशाहीचा आत्मा म्हणून ओळखली जाते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानामध्ये निवडणुकीला महत्त्वाचे स्थान दिले आहे. तेव्हा या आदर्श निवडणुकीचा अनुभव व लोकशाही प्रणालीची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून पारनेर तालुक्यातील प्राथमिक आश्रमशाळा ढवळपुरी येथे वर्गमंत्रीमंडळ व शाळा प्रतिनिधी यांची निवड प्रत्यक्ष मतदान पद्धतीने पार पडली.
प्राथमिक आश्रमशाळा ढवळपुरी येथे मागील नऊ वर्षांपासून पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांच्या वर्ग मंत्रिमंडळाच्या निवडी प्रत्यक्ष मतदानाच्या प्रक्रियेतून घेण्यात येतात. यामध्ये वर्ग प्रमुख, उपवर्ग प्रमुख अभ्यास प्रमुख, क्रीडा प्रमुख, सांस्कृतिक प्रमुख, वाचनालय प्रमुख, आरोग्य प्रमुख अशी पदे निवडली जातात. चालू वर्षीच्या निवडणुकीची अधिसूचना मुख्याध्यापक संदीप महांडुळे यांच्या मार्गदर्शनात शिक्षक व निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून लतीफ राजे यांनी सोमवारी काढली. त्यानंतर पाच रुपये अनामत रक्कम घेऊन विद्यार्थ्यांनी उमेदवारी अर्ज भरले. त्यावर सूचक तसेच अनुमोदक यांची नावे व सह्या सुद्धा घेण्यात येऊन गुरुवारी विद्यार्थ्यांना चिन्ह वाटप करण्यात आले. शुक्रवारी दुपारच्या सत्रात सर्वच वर्गांमध्ये एकाच वेळी मतपत्रिकांवर रबरी फुलीचा शिक्का मारून प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. विद्यार्थ्यांनी रांगा लावून मतदान प्रक्रिया पार पाडली. हजेरी पटाप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सह्या घेऊन बोटाला शाई लावून मतदान घेण्यात आले.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
•अटीतटीच्या लढती
मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर केंद्रप्रमुख म्हणून कामकाज पाहणारे सर्व वर्गशिक्षक यांनी आपापल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या समोर प्रत्यक्ष वर्गात मतमोजणी केली. यावेळी मतमोजणी होत असताना विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह व उत्कंठा दिसून आली. काही वर्गांमध्ये खूपच अटीतटीच्या लढती झाल्या तर दोन वर्गात समसमान मते पडल्याने चिठ्ठी टाकून पहिलीच्या विद्यार्थ्यांनी चिट्ठी उचलून विजयी विद्यार्थी घोषित करण्यात आले.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
• आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
वर्ग मंत्रिमंडळाची निवड झाल्यानंतर निवडून आलेल्या सर्व वर्गमंत्रीमंडळातील विद्यार्थ्यांनी शनिवारी शाळा प्रतिनिधीसाठी एक विद्यार्थी व एक विद्यार्थिनी यांची निवड तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या मोबाईल ॲप मार्फत केली. या मोबाईल ॲप मार्फत विद्यार्थ्यांनी मतदान करून शाळेचे प्रतिनिधी निवडून दिले यामध्ये विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आयुष गायकवाड तर विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून संस्कृती कोळेकर यांची निवड झाली. सर्व विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्व शिक्षक व मुख्याध्यापक संदीप महांडुळे यांनी अभिनंदन केले.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
आमच्या प्राथमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी वर्ग मंत्रिमंडळाच्या प्रतिनिधींची निवड प्रक्रिया शुक्रवार व शनिवारी पार पडली. यामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मतदानाचा अनुभव घेऊन निवडणूक प्रक्रियेची माहिती मिळाली. प्रत्येक वर्गातून निवडून आलेल्या विविध प्रतिनिधींना त्यांच्या कामकाजाची माहिती देऊन त्यांना वर्गाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी यातून मिळाली आहे. तसेच या सर्व वर्ग मंत्री मंडळातील सदस्यांनी आपले शाळेचे विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रतिनिधी निवडून दिले.
– संदीप महांडुळे
मुख्याध्यापक, प्राथमिक आश्रमशाळा ढवळपुरी
🔶🔶🔶🔶🔶🔶
शालेय वर्ग मंत्रीमंडळाची निवडणूक प्रक्रियेसाठी प्रत्यक्ष मतपत्रिकेवर प्रत्येक पदांसाठी उभे राहिलेल्या विद्यार्थ्यांची नावे टाकण्यात आली तसेच त्यांना पेन, पुस्तक, कॉम्प्युटर, पॅड अशी चिन्हे देण्यात आली. खोडरबर पासून बनविलेल्या रबरीफुलीच्या शिक्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी मतदान केले. तसेच विद्यार्थ्यांच्या मतदानाअगोदर सह्या घेऊन त्यांच्या बोटांना शाई लावण्यात आली. याप्रसंगी सर्व वर्गशिक्षकांनी केंद्रप्रमुखाची भूमिका पार पाडली. अशा प्रकारे विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष निवडणूक या अध्यापनाची प्रक्रिया यातून पार पडली.
– लतीफ राजे
शिक्षक व निवडणूक निर्णय अधिकारी





