अहिल्यानगर / भगवान गायकवाड, 

 मानसिक आजारामुळे घरापासून दुरावलेली अहिल्यानगर जिल्ह्यातील गंगू तब्बल २५ वर्षांनंतर तिच्या परिवारात आज परतली. कुटुंबीयांनी तिचे परिवारात अत्यानंदाने स्वागत करून तिच्या जीवन कहाणीचा सुखांत केला.नेपाळ मधील एका संस्थेत उपचारांसाठी दाखल असलेल्या या महिलेची माहिती ‘श्रद्धा रिहॅबिलिटेशन फाउंडेशन’ संस्थेला मिळाली. कर्जत (जिल्हा रायगड ) येथील ही संस्था डॉ. स्मिता आणि डॉ.भरत वाटवानी मागील 21 वर्षांपासून चालवतात.

 आजवर 15 हजाराहून अधिक रुग्णांचे त्यांनी कुटुंबात पुनर्वसन केले. या कार्याबद्दल रॅमन मॅगसेसे या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने वर्ष 2018 मध्ये त्यांना गौरविण्यात आले.  

डॉ. वाटवानी यांच्या श्रद्धा रिहाबिलिटेशन फाउंडेशन संस्थेस नेपाळमधील गंगू या महिलेची माहिती मिळाली. ‘श्रद्धा फाउंडेशन’ने तिला भारतातील आपल्या प्रकल्पात आणले. तिच्यावर मानसिक उपचार सुरू केले. समुपदेशनादरम्यान तिने तिचे नाव ‘गंगू’ आणि गाव ‘पथरवाले, जिल्हा नगर’ असे सांगितले. 

या माहितीच्या आधारे श्रद्धा फाऊंडेशनच्या टीमने तिचे घर आणि परिवार यांचा शोध सुरू केला.गावात पोहोचल्यावर येथील परिस्थिती बदलल्याने गंगूला काहीच आठवत नव्हते. रस्ते, शाळा, दुकाने सर्वच अनोळखी वाटले. वस्तीवर विचारपूस केली असता कोणीच तिला ओळखले नाही.ओळख पटत नसल्याने निराश होऊन श्रद्धा फाउंडेशन ची टीम परत जाण्याच्या तयारीत असतानाच येथील चौकात लग्नाची मोठी वरात आडवी आली. या वरातीच्या गर्दीत एका वृद्धाने सुधाकर शंकर पवार हे नाव परिचित असल्याचे सांगितले.

 त्यांच्या स्मृती जाग्या झाल्या. त्यांनी गंगूला निरखून पाहिले 
गंगूचे पती सुधाकर यांना तात्काळ शोधून गंगुला भेटवण्यात आले. 
 सुरुवातीला सुधाकर यांनीही तिला ओळखले नाही. ते म्हणाले की, माझ्या पत्नीचे नाव तर शोभा होते. पण 25 वर्षांपूर्वी हरवलेली शोभा हीच ‘गंगू’ असल्याची त्यांची खात्री पटली. गंगुने लाजून नमस्कार केल्यावर सर्वच ओळखी पटल्या.

गंगू जेव्हा घर सोडून गेली होती, तेव्हा तिचा धाकटा मुलगा केवळ दोन वर्षांचा होता. आज तो तरुण झाला आहे. आपल्या आईला पाहताच त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. “हीच माझी आई आहे, ही माझ्या आजीसारखी दिसते,” असे म्हणत त्याने तिला मिठी मारली. आधी संशयाने पाहणारा गंगूचा मोठा मुलगा देखील नंतर भाऊक झाला . सर्वांचेच डोळ्यातून अश्रूपात होऊ लागला. गंगू धाकट्या मुलाच्या घरी गेली.२५ वर्षांनंतर घरी आणि गावात परतलेल्या ‘गंगू उर्फ शोभा’ हिला पाहण्यासाठी आणि भेटण्यासाठी अख्खा गाव लोटला. अनेकांनी तिला ओळखले आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. श्रद्धा रिहाबिलिटेशन फाउंडेशनच्या कार्यकर्त्या अनामिका अंबोरे आणि चंदना पाल यांनी गंगुला गावात आणले. त्यांनी अत्यंत संवेदनशीलतेने परिस्थिती हाताळली. 
त्यामुळे एक विखुरलेले कुटुंब पुन्हा एकत्र आले.

🔶🔶🔶🔶🔶🔶
स्नेहालय संस्थेचा मानसग्राम हा मानसिक आरोग्यावरील बहुउद्देशीय प्रकल्प आहे .डॉ. वाटवानी यांच्या श्रद्धा रिहाबिलिटेशन फाउंडेशन संस्थेच्या सहयोगातून स्नेहालय रस्त्यांवरील मनोरुग्णांसाठी स्नेहश्रद्धा पुनर्वसन प्रकल्प
अहिल्यानगर जिल्ह्यात राबवते.
रस्त्यांवर दिसलेल्या कुठल्याही बेवारस रुग्णाला तात्काळ उपचार आणि कौटुंबिक पुनर्वसन मिळवून देण्यासाठी 9011011006 येथे संपर्काचे आवाहन करण्यात आले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *