पारनेर : ता. प्रतिनिधी,
पावसाळी अधिवेशनात आमदार काशिनाथ दाते यांची शासनाकडे भावनिक साद; माहिती अधिकाराच्या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी
सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशन २०२७ मध्ये औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांनी ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांच्या प्रस्तावित उपोषणाचा विषय अत्यंत संवेदनशीलपणे सभागृहात उपस्थित करत शासनाला तातडीने हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले.
सभागृहात बोलताना आमदार दाते म्हणाले की, “अध्यक्ष महोदय, औचित्याचा मुद्दा सुरू करण्यापूर्वी मी आपल्या माध्यमातून शासनाकडे एक महत्त्वाची विनंती करू इच्छितो. माझ्या २२४ पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात पद्मभूषण अण्णासाहेब हजारे आणि पद्मश्री पोपटराव पवार यांसारखे दोन थोर समाजसेवक आहेत. माहिती अधिकार कायद्यातील सुधारणांच्या संदर्भात अण्णांनी येत्या ५ जुलैपासून उपोषणाचा इशारा दिला आहे. अण्णांचे वय आज ९० वर्षे असून अशा वयात उपोषणाचा शारीरिक त्रास सहन करणे अत्यंत कठीण आहे. त्यामुळे माझ्या पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या वतीने शासनाला विनंती करतो की, अण्णांवर उपोषण करण्याची वेळ येऊ नये, यासाठी तातडीने सकारात्मक संवाद साधून मार्ग काढावा.”
आमदार दाते सरांनी अण्णासाहेब हजारे यांच्याविषयी व्यक्त केलेली ही आत्मीयता आणि त्यांच्या आरोग्याबाबत व्यक्त केलेली चिंता सभागृहाचे विशेष लक्ष वेधून घेत होती. मतदारसंघातील ज्येष्ठ समाजसेवकांचा सन्मान राखत, त्यांच्या आंदोलनामागील विषयावर शासनाने संवेदनशील भूमिका घ्यावी, अशी स्पष्ट अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
माहिती अधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या अण्णा हजारे यांना उपोषणासारखे टोकाचे पाऊल उचलावे लागू नये, यासाठी शासनाने तातडीने पुढाकार घ्यावा, अशी भावना आमदार काशिनाथ दाते यांनी सभागृहात मांडल्याने त्यांच्या या भूमिकेची सर्वत्र चर्चा होत आहे.




