विद्यार्थी सुरक्षा, बाल संरक्षण आणि महिला सक्षमीकरणासाठी पोलीस विभाग, शिक्षण विभाग आणि स्नेहालय संस्था यांच्या संयुक्त पुढाकार

अहिल्यानगर / भगवान गायकवाड, 

अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये “पोलीस दीदी” उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात यावा, तसेच विद्यार्थी, पालक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि शाळा वाहन चालक यांच्यासाठी नियमित जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत, या मागणीचे सविस्तर निवेदन आज स्नेहालय संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे सादर करण्यात आले.

स्नेहालय संस्था गेल्या 38 वर्षांपासून महिला, बालक, किशोरवयीन मुलामुली आणि वंचित घटकांच्या संरक्षण, सक्षमीकरण, शिक्षण, पुनर्वसन व हक्क संरक्षणासाठी कार्यरत आहे. बालविवाह प्रतिबंध, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध, बाल संरक्षण, शिक्षण, समुपदेशन, कौटुंबिक पुनर्वसन आणि संकटग्रस्त बालकांच्या संरक्षणासाठी संस्थेचे विविध प्रकल्प सातत्याने कार्यरत आहेत.

नुकतीच अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, भरोसा सेल आणि स्नेहालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व पोलीस दीदी आणि संबंधित अधिकाऱ्यांसाठी विशेष “पोलीस दीदी प्रशिक्षण कार्यशाळा” आयोजित करण्यात आली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यशाळेत बाल संरक्षण, मुलामुलींची मानसिकता, संवेदनशील हस्तक्षेप, कायदेशीर जबाबदाऱ्या, संवाद कौशल्य आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजनांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यशाळेत जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी मा. सौ. संध्या गायकवाड, उपशिक्षणाधिकारी पोपट धामणे, स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक प्रियंका आठरे, ॲड. श्याम आसावा, डॉ. प्राजक्ता कुलकर्णी, डॉ. विनय कोपरकर, डॉ. तेजस्विनी मिस्कीन यांच्यासह विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले होते. विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी पोलीस, शिक्षण विभाग आणि सामाजिक संस्थांमध्ये मजबूत समन्वय उभारण्याची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली होती.

याच कार्यशाळेच्या अनुषंगाने आज रोजी शिक्षण विभागाकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत “पोलीस दीदी” माहिती फलक लावणे, विद्यार्थी-पालक-शिक्षक संवाद कार्यक्रम आयोजित करणे, शाळा वाहन चालक व वाहतूक कर्मचाऱ्यांसाठी विशेष सुरक्षा सत्रे घेणे, सायबर सुरक्षा, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध, सुरक्षित स्पर्श (Safe Touch) – असुरक्षित स्पर्श (Unsafe Touch), बालविवाह प्रतिबंध, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, महिला सुरक्षा आणि विद्यार्थ्यांचे कायदेशीर हक्क या विषयांवर नियमित मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदन स्वीकारताना शिक्षणाधिकारी मा. सौ. संध्या गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी “पोलीस दीदी आणि काका” उपक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचे नमूद केले. पोलीस प्रशासन, शिक्षण विभाग आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयातून हा उपक्रम जिल्ह्यातील प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक सकारात्मक पावले उचलली जातील, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.

स्नेहालयाचे संस्थापक डॉ. प्राजक्त आणि डॉ.गिरीश कुलकर्णी आणि अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या पुढाकारातून जिल्ह्यात “पोलीस दीदी” संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न सुरू असून, विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, मुलींवरील अत्याचार व छेडछाडीच्या घटना रोखणे, सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि विद्यार्थ्यांशी विश्वासाचे नाते निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

स्नेहालय संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील कोणत्याही शाळा, महाविद्यालय, पालक गट, ग्रामस्तरीय समिती किंवा इतर सामाजिक घटकांसोबत बाल संरक्षण, पोलीस दीदी, बालविवाह प्रतिबंध, सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध या विषयांवर जनजागृती कार्यक्रम राबविण्यास संपूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे.

सदर निवेदन स्नेहालयच्या विविध प्रकल्पांच्या वतीने ॲड श्याम असावा, संतोष धर्माधिकारी (प्रकल्प समन्वयक, स्नेह बाल आधार), विकास सुतार (प्रकल्प समन्वयक, युवा निर्माण प्रकल्प), विद्या घोरपडे (प्रकल्प समन्वयक, स्नेहधार प्रकल्प) आणि प्रविण कदम (प्रकल्प व्यवस्थापक, उडान प्रकल्प) यांनी सादर केले.

यावेळी “प्रत्येक शाळेत पोलीस दीदी, प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षिततेची हमी आणि प्रत्येक पालकाला विश्वास” हे उद्दिष्ट समोर ठेवून जिल्हास्तरावर व्यापक जनजागृती अभियान राबविण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

“विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा केवळ शिक्षणाचा नाही, तर त्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे पोलीस, शिक्षण विभाग, पालक आणि सामाजिक संस्था यांनी एकत्रितपणे काम केल्यास अहिल्यानगर जिल्हा बालसुरक्षेच्या क्षेत्रात आदर्श जिल्हा ठरू शकतो,” असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
– आपला नम्र…
संतोष धर्माधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *