पारनेर / प्रतिनिधी,
पारनेर तालुक्यातील काकणेवाडी येथे आज महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी “गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” योजनेअंतर्गत कामाचा शुभारंभ पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. जलसंधारण, शेती विकास आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या उपक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे.
याप्रसंगी प्रदिप वाळुंज, सरपंच गिताराम वाळुंज, जयवंतशेठ वाळुंज, भास्कर वाळुंज सर,अशोक वाळुंज, योगेश वाळुंज, ज्ञानदेव वाळुंज, दगडु वाळुंज, बाळासाहेब वाळुंज, संदीप वाळुंज, मधुकर झावरे, मारुती वाळुंज, संपत वाळुंज, भाऊसाहेब वाळुंज, सोन्याबापु वाळुंज, ओंकार पुरी, प्रणव वाळुंज, भगवान वाळुंज, दत्तात्रय किसन वाळुंज, सुभाष वाळुंज, रविंद्र वाळुंज, लक्ष्मण वाळुंज,सुनिल वाळुंज, नामदेव वाळुंज, मंगेश वाळुंज, पोपट वाळुंज आदी मान्यवरांसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या योजनेअंतर्गत धरणांमध्ये वर्षानुवर्षे साचलेला गाळ बाहेर काढून तो शेतकऱ्यांना शेतीसाठी उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे धरणांची पाणी साठवण क्षमता वाढण्यास मदत होते, तर दुसरीकडे गाळामुळे जमिनीची सुपीकता वाढून शेती उत्पादनातही भरघोस वाढ होते. नैसर्गिक पोषक घटकांनी युक्त असलेला हा गाळ पिकांसाठी नैसर्गिक खताचे काम करत असल्याने रासायनिक खतांवरील खर्चातही मोठी बचत होणार आहे.
यावेळी बोलताना आमदार काशिनाथ दाते सर म्हणाले की, “पाणी हा भविष्यातील सर्वात मोठा प्रश्न असून जलसंधारण ही काळाची गरज आहे. गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजना ही केवळ धरण स्वच्छ करण्याची मोहीम नसून शेतकऱ्यांच्या समृद्धीचा आणि शाश्वत शेतीचा मार्ग आहे. धरणातील गाळ शेतात गेल्याने जमिनीची उत्पादकता वाढते, तर धरणात अधिक पाणीसाठा उपलब्ध होऊन भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यास मदत होते. शासनाच्या अशा लोकहिताच्या योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.”
तसेच त्यांनी शेतकऱ्यांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन करत जलसंधारणाच्या कामात लोकसहभाग आवश्यक असल्याचेही नमूद केले. “आजची पाण्याची बचत ही उद्याच्या पिढीसाठीची मोठी गुंतवणूक आहे. गावागावात जलसंवर्धनाची चळवळ उभी राहिली तरच भविष्यातील पाणीप्रश्नांवर कायमस्वरूपी उपाय होऊ शकतो,” असेही ते म्हणाले.
मृद व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येणारी ही योजना राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये प्रभावीपणे सुरू असून, धरणांची साठवण क्षमता वाढवणे आणि शेतकऱ्यांच्या जमिनीचा दर्जा उंचावणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.




