पारनेर / भगवान गायकवाड,
माणसाची जिद्द आणि चिकाटी असेल, तर संकटांचे डोंगरही पार करता येतात, याचा प्रत्यय पारनेरमधील जिजामाता विद्यालयाचा विद्यार्थी जयदीप सुरेखा जगन्नाथ औटी याने दिला आहे. मागील वर्षी एका भीषण अपघातात उजव्या हाताची बोटे गमावल्यानंतरही जयदीपने हार मानली नाही. त्याने डाव्या हाताने लिहिण्याचा सराव केला आणि नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात ८५ टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले.जयदीप हा मागील वर्षी नववीत शिकत असताना त्याच्यावर काळाने घाला घातला. कडबा कुट्टी करण्याच्या यंत्रात त्याचा उजवा हात अडकल्याने त्याला आपली बोटे गमवावी लागली. या अपघातानंतर तो तब्बल तीन महिने रुग्णालयात उपचार घेत होता. उजवा हात निकामी झाल्याने भविष्यातील शिक्षणाचे काय? असा प्रश्न समोर उभा होता. मात्र, जयदीपने खचून न जाता परिस्थितीशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला.
दहावीचे महत्त्वाचे वर्ष समोर असताना त्याने डाव्या हाताने लिहिण्याचा सराव सुरू केला. सुरुवातीला येणाऱ्या अडचणींवर मात करत त्याने अक्षर सुधारले आणि वेगाने लिहिण्याचा सराव केला. जिजामाता विद्यालयातील शिक्षकांनी आणि कुटुंबीयांनी त्याला सतत प्रोत्साहन दिले, ज्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढत गेला.जयदीपच्या या यशाचे वृत्त समजताच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ,आनंद मेडिकल फाउंडेशनचे प्रमुख डॉ. सादिक राजे ,फहाद राजे आणि प्राचार्य संतोष ठाणगे यांनी त्याचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले. त्याच्या या संघर्षाला त्याचे वडील, आई सुरेखा औटी आणि मामा प्रा. तुषार ठुबे यांचे भक्कम पाठबळ लाभले
🔶🔶🔶🔶🔶
“जयदीपची जिद्द खरोखरच कौतुकास्पद आहे. उजव्या हाताची बोटे नसतानाही डाव्या हाताने पेपर लिहून त्याने जे यश मिळवले आहे, ते इतर सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. जिद्दीच्या जोरावर काहीही साध्य करता येते, हे त्याने सिद्ध केले.”
– अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक
🔶🔶🔶🔶🔶🔶
“नववीत असताना अपघातात बोटे गेल्यावर जयदीप तीन महिने उपचार घेत होता. आजारातून बरा झाल्यावर त्याने तातडीने डाव्या हाताने लिहिणे सुरू केले. शिक्षणाची ओढ आणि मनात जिद्द असल्याने त्याने अभ्यास सुरू ठेवला. आज त्याने ८५ टक्के गुण मिळवले, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.”
– प्रा. तुषार ठुबे, प्रमुख, आडवाटेंच पारनेर




