पारनेर / भगवान गायकवाड, 

 श्रीरामपूर येथील संतापजनक घटनेत एका 5 वर्षीय बालिकेला पेप्सीचे आमिष दाखवून 22 वर्षीय तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली . या पार्श्वभूमीवर बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी नागरिकांनी तात्काळ हस्तक्षेप करण्याचे आवाहन
बाल स्नेह आधार आणि उडान प्रकल्पाने केले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठी काम करणाऱ्या स्नेह बाल आधार प्रकल्पाने मागील 3 महिन्यात बाल लैंगिक अत्याचारांच्या 12 प्रकरणात यशस्वी हस्तक्षेप करून कठोर कारवाईसाठी पाठपुरावा केला.


 वरील प्रकरणात पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेची माहिती मिळताच स्नेहालय संचलित *स्नेह बाल आधार आणि उडान प्रकल्पाची टीम* तात्काळ श्रीरामपूर येथे दाखल झाली. टीमने पीडित बालिकेच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला. या कठीण प्रसंगात कुटुंब एकटे नाही, याची जाणीव करून देत प्रकल्पाच्या सदस्यांनी भावनिक तसेच कायदेशीर मार्गदर्शन केले.

दरम्यान, श्रीरामपूर शहर पोलिसांनी आरोपीला त्वरीत अटक केली असून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी संवेदनशीलता आणि तत्परता दाखवत स्नेह बाल आधार प्रकल्पाला सहकार्य केले.

तसेच न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान पीडित बालिकेला आवश्यक ती मदत मिळावी, तिचे समुपदेशन व्हावे आणि तिच्या हक्कांचे संरक्षण व्हावे यासाठी स्नेह बाल आधार प्रकल्पाने पुढाकार घेतला आहे. या प्रकरणात स्थानिक नागरिकांनीही सामाजिक जबाबदारी पार पाडत स्नेह बाल आधार आणि उडान प्रकल्पाला मदतीचा हात दिला.

सदर प्रकरणात पीडित बालिकेला पुढील प्रक्रियेसाठी बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात येणार आहे. अंतिम न्यायालयीन निकाल लागेपर्यंत स्नेह बाल आधार प्रकल्पाची टीम बालिकेच्या आणि तिच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात अहोरात्र, नि:शुल्क मदतीसाठी
7770027505/9011026495 येथे संपर्काचे आवाहन संतोष धर्माधिकारी,स्नेह बाल आधार प्रकल्पाने केले आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *