पारनेर / भगवान गायकवाड, 
        आईच्या कुशीत बाळ सुरक्षित असते असं म्हणतात, पण जेव्हा तीच कूस मद्याच्या नशेत झिंगलेली असते, तेव्हा नियतीलाही पाझर फुटल्याशिवाय राहत नाही. पारनेर बसस्थानकाच्या आवारात सोमवारी दुपारी माणुसकीला काळिमा फासणारी आणि काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली. रणरणत्या उन्हात, एका मद्यधुंद दांपत्याच्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या केवळ तीन महिन्यांच्या निष्पाप जिवाची जी ससेहोलपट झाली, ती पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.

दुपारची वेळ होती, सूर्याचा पारा चाळीशी पार गेलेला. बसस्थानकाच्या गेटजवळ उन्हाच्या झळा लागत असतानाच, एक परप्रांतीय मोलमजुरी करणारे दांपत्य मद्याच्या नशेत धुंद होऊन भर रस्त्यात लोळत होते. स्वतःच्या देहाचे भान नसलेल्या या दांपत्याला आपल्या कडेवर असलेल्या त्या तीन महिन्यांच्या जिवाची साधी जाणीवही नव्हती. ते कोमल बाळ उन्हाच्या कडाक्याने घामाघूम होऊन रडत होते, भुकेने तडफडत होते; पण नशेच्या अंमलाखाली असलेल्या त्या मातेला बाळाचा टाहो ऐकू येत नव्हता.

बसस्थानकावरील सुरक्षा रक्षकांनी त्यांना वारंवार उठवण्याचा प्रयत्न केला, पण मद्याची धुंदी एवढी होती की ते कोणालाही दाद देत नव्हते. त्याच वेळी ‘स्नेहालय’चे सोशल वर्कर आणि पत्रकार भगवान गायकवाड यांचे लक्ष या विदारक दृश्याकडे गेले. त्यांनी विलंब न लावता सामाजिक कार्यकर्ते नियाज राजे, किरण सोनवणे आणि सुरक्षा रक्षकांच्या मदतीने त्या दांपत्याला आणि त्या चिमुकल्याला सावलीत नेले. उडान प्रकल्पाचे व्यवस्थापक प्रवीण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या चिमुकल्याला सुरक्षितता मिळवून देण्यात आली.

या घटनेने पुन्हा एकदा पारनेर बसस्थानकावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. भरदिवसा असे प्रकार घडत असताना तिथे एकही पोलीस कर्मचारी तैनात नव्हता, ही खेदाची बाब आहे. अशा परिस्थितीत मुलांच्या अपहरणासारख्या गंभीर घटना घडू शकतात.बसस्थानक परिसरात कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त असावा, जेणेकरून अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही आणि कोणत्याही निष्पाप जिवाचे आयुष्य पणाला लागणार नाही, अशी मागणी आता जोर धरत आहे.

🔶🔶🔶🔶🔶
 नशेत स्वतःला विसरता येते, पण पोटच्या गोळ्याला उन्हात तडफडत सोडणारी हि नशा भयानक आहे. आज माणुसकी जिवंत होती म्हणून त्या बाळाला जिवदान मिळाले पण उद्या काय? असा सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे.
               एक प्रवासी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *