अमरधाम( स्मशानभूमी)मधील ‘त्या’ रणरागिणींचा सन्मान!


 


पारनेर / भगवान गायकवाड, 
      जगासाठी जी जागा भीती आणि दुःखाचे प्रतीक असते, त्याच स्मशानभूमीला (अमरधाम) आपले घर मानून, मानवी प्रवासाच्या अंतिम टप्प्यात सेवा देणाऱ्या महिलांचा सन्मान करून पारनेरमध्ये जागतिक महिला दिन खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण ठरला. पारनेर येथील अमरधाममध्ये अंत्यविधीचे काम करणाऱ्या रुक्मिणीबाई सखाराम विरे आणि शीतल पीयूष विरे यांचा विशेष गौरव करण्यात आला.

पारनेर शहर आणि परिसरातील कोणत्याही जाती-धर्माच्या व्यक्तीचा मृत्यू झाला की, त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी संपूर्ण विरे कुटुंब अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडते. जिथे पाऊल ठेवतानाही अनेकांचे मन धजावत नाही, अशा अमरधाममध्ये रुक्मिणीबाई आणि शीतल या महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ऊन, वारा, पाऊस किंवा रात्रीची वेळ असो, लोकसेवेचा हा वसा त्यांनी नित्यनियमाने जपला आहे. समाजातील या दुर्लक्षित पण अत्यंत महत्त्वाच्या घटकाची दखल घेत यंदाचा महिला दिन त्यांच्यासोबत साजरा करण्याचा ॲड.भारती तराळ यांच्या संकल्पनेतून निर्णय घेण्यात आला.
अमरधाममधील वास्तव्यामुळे आणि कामाच्या स्वरूपामुळे हे कुटुंब सामाजिक प्रवाहात अनेकदा दुर्लक्षित राहते. मात्र, त्यांच्या कार्याची महती ओळखून अखिल भारतीय ग्राहक पंचायत आणि स्नेहालय संस्था यांच्या वतीने या महिलांना नवीन साडी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या धाडसाचे आणि सेवावृत्तीचे कौतुक केले.या कार्यक्रमाप्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या महिला तालुकाध्यक्ष सुनीताताई पवार, स्नेहालय संस्थेचे स्वयंसेवक ॲड. भारती तराळ आणि स्नेहालय संस्थेच्या ‘उडान’ प्रकल्पाचे सोशल वर्कर तथा पत्रकार भगवान गायकवाड उपस्थित होते.

स्मशानभूमीसारख्या ठिकाणी राहूनही माणुसकीची सेवा करणाऱ्या या विरे कुटुंबाची कार्याची चर्चा संपूर्ण पारनेर तालुक्यात होत आहे. समाजाच्या रूढ चौकटी मोडून काढणाऱ्या या महिला खऱ्या अर्थाने ‘स्त्री शक्ती’चे प्रतीक ठरल्या आहेत. त्यांच्या या कार्यामुळे अंत्यसंस्कारासारख्या पवित्र कामाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्यास नक्कीच मदत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *