अहिल्यानगर / भगवान गायकवाड ( पारनेर)
अहिल्यानगरच्या सर्वांगीण विकासाची पंचसूत्री सहविचारातून पुढे नेण्याचा मनोदय नूतन उपमहापौर धनंजय जाधव यांनी त्यांच्या सामाजिक संस्थांनी आयोजिलेल्या सत्कारास उत्तर देताना व्यक्त केला. ॲड.जाधव म्हणाले की, पायाभूत नागरी सुविधा , महापालिकेच्या शाळांमधून मिळणारे शिक्षण , मनपाच्या दवाखान्यांमधील आरोग्य सुविधा , खेळ – खेळाडू आणि क्रीडांगणांच्या विकासाचे सातत्यपूर्ण उपक्रम आणि स्थानिक नगरी संस्कृती विकासाची पंचसूत्री राबविणे, ही महापालिकेच्या आगामी कारभाराची दिशा असेल.
येथील क्रीडामहर्षी मेजर दिनुभाऊ कुलकर्णी क्रीडा मंडळाने नगर मधील सर्व खेळाडू आणि क्रीडा संस्थांतर्फे नूतन उपमहापौर जाधव त्यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका सौ. सुप्रिया यांचा नागरी सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर खेडकर आणि प्रमुख मार्गदर्शक ( नि.) प्राचार्य डॉ. खासेराव शितोळे होते. स्नेहालय संस्थेमधील रवींद्रनाथ टागोर सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.
ॲड. जाधव यावेळी म्हणाले की,आपले आजोबा दत्तू खलिफा, आजी नानीबाई , वडील कृष्णा यांच्याकडून नगरसेवेचा वसा आणि वारसा मिळाला. त्यामुळे राजकारणात संधीची अपेक्षा न करता सतत लोकांसोबत राहून त्यांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले. अहिल्यानगर हे मूलतः कष्टकरी,गरीब आणि मध्यमवर्ग यांचे शहर आहे. येथे रहिवाशांना आर्थिक झळ न देता दर्जेदार पायाभूत सुविधा देण्याला आपण महत्व दिले आणि देणार असल्याचे उपमहापौरांनी सांगितले..
क्रीडामंडळाचे सचिव नंदेश शिंदे यांनी प्रस्तावना केली. सौ.मनीषा शिंदे यांनी जाधव दांपत्याच्या मानपत्र यांचे वाचन केले.स्नेहालयाचे संचालक हनीफ शेख यांनी काही प्रमुख नागरी समस्यांवर नागरिकांतर्फे मांडणी केली.आदर्श शिक्षक भाऊसाहेब कबाडी आणि अरुण पवार यांनी सूत्रसंचालन केले.
दत्ता पांचाळ यांनी संतांचे अभंग कार्यक्रमात सादर केले.




