आमदार काशिनाथ दाते यांची भेट घेऊन ब्रह्माकुमारी संस्थेची चर्चा

पारनेर / भगवान गायकवाड, 
तरुण पिढीसमोरील व्यसनाधीनतेच्या वाढत्या विळख्यावर मात करण्यासाठी आणि समाजात व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने ठोस पावले उचलण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर पारनेर सेंटरच्या संचालिका ब्रह्माकुमारी साधना दिदी, राम भाई आणि पत्रकार भगवान गायकवाड यांनी पारनेरचे आमदार काशिनाथ दाते सर यांची सदिच्छा भेट घेतली. या अत्यंत महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या ‘दहा करोड नशामुक्त महाअभियान’ या देशव्यापी आणि महत्त्वाकांक्षी उपक्रमाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

    आजच्या धकाधकीच्या युगात आणि आधुनिक जीवनशैलीत तरुण पिढी वेगवेगळ्या व्यसनांच्या आहारी जात असल्याचे चित्र अत्यंत चिंताजनक आहे. हे केवळ एका व्यक्तीचे किंवा कुटुंबाचे नसून संपूर्ण समाजाचे आणि देशाचे मोठे नुकसान करत आहे. या गंभीर समस्येवर वेळीच अंकुश न लावल्यास भविष्यात त्याचे भयाण परिणाम समाजाला भोगावे लागतील, अशी भीती ब्रह्माकुमारी साधना दीदी यांनी या वेळी व्यक्त केली. या समूळ उच्चाटनासाठी केवळ कायदेशीर कारवाई पुरेशी नसून लोकांच्या मानसिकतेत आणि विचारांमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ब्रह्माकुमारी संस्थेमार्फत संपूर्ण देशात राबविण्यात येत असलेल्या ‘नशामुक्त भारत अभियाना’चाच एक भाग म्हणून पारनेर तालुक्यातही ‘दहा करोड नशामुक्त महाअभियान’ प्रभावीपणे राबविण्याचा मानस आहे. या मोहिमेच्या माध्यमातून तालुक्यातील शाळा, महाविद्यालय, ग्रामीण भाग आणि थेट तरुण वर्गापर्यंत पोहचून त्यांना अध्यात्माची जोड देत व्यसनमुक्त जीवनाची प्रेरणा दिली जाणार आहे. युवकांमध्ये सकारात्मक विचारांची पेरणी करून त्यांना योग्य मार्गावर चालण्यासाठी प्रवृत्त करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे

🔶🔶🔶🔶🔶
“व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी शासन आणि प्रशासकीय पातळीवर सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. पारनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि युवा पिढीला उज्ज्वल भविष्याकडे नेण्यासाठी अशा प्रकारच्या लोकजागर अभियानांची नितांत गरज आहे.     

     — आमदार काशिनाथ दाते
आमदार काशिनाथ दाते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *