वृक्षारोपणाचा संदेश; विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव
पारनेर/प्रतिनिधी :
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पारनेर तालुकाध्यक्ष, आक्रमक युवा नेते तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार काशिनाथ दाते यांचे निकटवर्तीय सहकारी राजेंद्र उबाळे यांचा वाढदिवस पारनेर तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवून उत्साहात साजरा करण्यात आला.
वाढदिवसानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत टाकळी ढोकेश्वर येथील प्राचीन ढोकेश्वर मंदिर परिसर तसेच नारायणगव्हाण येथे वृक्षारोपण करण्यात आले. वाढदिवस साजरा करताना समाजाप्रती आपली जबाबदारीही पार पाडली पाहिजे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. उपस्थित कार्यकर्त्यांनी वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारत पर्यावरण संरक्षणाची शपथ घेतली.
टाकळी ढोकेश्वर येथे झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा नेते प्रकाश भालेराव, विश्वास पंडित, संकेत ढोकळे, पंकज गायकवाड, गौतम रोकडे, आदित्य वाघमारे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी राजेंद्र उबाळे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याचे कौतुक केले.
राजेंद्र उबाळे हे पारनेर तालुक्यात सामाजिक, राजकीय व जनसंपर्काच्या माध्यमातून सक्रिय कार्य करत असून विविध लोकहिताच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत असतात. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध भागांत शुभेच्छांचा वर्षाव झाला.
यावेळी आमदार काशिनाथ दाते यांनीही राजेंद्र उबाळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. याशिवाय विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि मित्रपरिवाराने दूरध्वनी, प्रत्यक्ष भेटी तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.




