पारनेर / भगवान गायकवाड,
अहिल्यानगर येथील वंचितांसाठी कार्यरत असलेल्या स्नेहालय संस्थेमध्ये कर्मयोगिनी साधनाताई आणि महामानव बाबा आमटे भवन या नव्याने उभारलेल्या पुनर्वसन संकुलाचे लोकार्पण येत्या मंगळवारी, दि. २ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. समाजातील वंचित आणि समस्याग्रस्त घटकांच्या निवासाकरिता लोकसहभागातून हे भव्य संकुल उभे राहिले आहे.
१५ हजार चौरस फूट क्षेत्रफळात विस्तारलेले हे सुसज्ज संकुल स्नेहालयातील १८ वर्षांवरील लाभार्थी आणि सेवाव्रती यांच्या कायमस्वरूपी निवासासाठी तयार करण्यात आले आहे.
स्नेहालय संस्थेच्या अध्यक्षा जया जोगदंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महत्त्वपूर्ण लोकार्पण सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यात प्रामुख्याने गेली ५ दशके मराठवाड्याच्या पायाभूत समस्यांवर काम करणारे मानवलोक संस्थेचे संघटक सौ. कल्पना आणि अनिकेत लोहिया, नेदरलँड्स येथील आधार फॉर यू संस्थेचे संस्थापक सौ. वृंदा आणि गिरीश ठाकूर, नगर जिल्ह्याचे भुमिअभिलेख विभागाचे उपअधीक्षक अविनाश मिसाळ आणि नगरचे पोलीस उपाधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांचा समावेश आहे.या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांकडून सद्यस्थितीवरील चिंतन आणि मार्गदर्शन ऐकण्याची अमूल्य संधी उपस्थितांना मिळणार आहे. स्नेहालयाच्या या लोककल्याणकारी उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला ठेवण्यात आला आहे.
स्नेहालयाच्या या नवीन संकुलामुळे वंचित घटकांच्या पुनर्वसन आणि स्वावलंबी जीवनाला एक नवी दिशा मिळणार आहे.





