पारनेर / ता. प्रतिनिधी,
मतदारसंघातील ग्रामीण भागाच्या विकासाला आणखी एक महत्त्वपूर्ण बळ मिळाले असून, लेखाशिर्ष ३०५४ अंतर्गत गट-बमधून तब्बल १५ कोटी रुपयांच्या आठ महत्त्वपूर्ण रस्ता विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याचे आमदार काशिनाथ दाते सर यांनी सांगितले. मतदारसंघातील ग्रामीण रस्त्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला या मंजुरीच्या माध्यमातून मोठे यश मिळाले असून, या कामांमुळे ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम आणि गतिमान होणार आहे.
मंजूर कामांमध्ये प्रजिमा-१९२ निघोज ते कोल्हे वस्ती रस्ता, सा.क्र. ०/०० ते १/५०० कामासाठी २ कोटी ८० लाख रुपये, प्रजिमा-१९२ वडनेर बु. मुक्ताबाई शिव ते वाकण मळा सुकाळे वस्ती रस्ता, सा.क्र. ०/०० ते ३/०० यासाठी १ कोटी ९० लाख रुपये, प्रजिमा-१९२ ते शिववाडी-मोरवाडी- लामखडे वस्ती रस्ता, सा.क्र. ०/०० ते ९/०० यासाठी २ कोटी ६० लाख रुपये, तसेच NH-७६१ कुंरद भोसलेवाडी ते नरवडे वाडी रस्ता, सा.क्र. ०/०० ते ३/०० यासाठी २ कोटी ६० लाख रुपये निधीची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
याशिवाय वाजेवाडी बाबरमळा-बो-हाडे वस्ती कॅनॉल रस्ता, सा.क्र. ०/०० ते ३/०० या कामासाठी ९० लाख रुपये, प्रजिमा-१९२ ते रसाळवाडी रस्ता, सा.क्र. ०/०० ते ३/०० यासाठी २ कोटी ८० लाख रुपये, वडनेर बु. ते टेंभीमळा रस्ता, सा.क्र. ०/०० ते २/४०० यासाठी ७० लाख रुपये आणि वाजेवाडी ढोकमाळ ते कॅनॉल रस्ता, सा.क्र. ०/०० ते २/६०० यासाठी ७० लाख रुपये अशा एकूण १५ कोटी रुपयांच्या आठ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असुन लवकरच या कामांचा शुभारंभ होणार असल्याची माहिती आमदार दाते यांनी सांगितले.
या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याबद्दल आमदार काशिनाथ दाते सर यांनी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सौ. सुनेत्रा पवार, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री मा. जयकुमार गोरे तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांचे विशेष आभार मानले आहेत.
🔶🔶🔶🔶🔶🔶
“रस्ता विकासातून गावागावांचा विकास” या भूमिकेतून मतदारसंघातील रस्त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्याच पाठपुराव्याच्या माध्यमातून एकाच वेळी आठ महत्त्वपूर्ण रस्ता कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाल्याने पारनेर मतदारसंघातील ग्रामीण रस्ते विकासाला निश्चितच नवी दिशा आणि गती मिळणार आहे, १५ कोटी रुपयांच्या या प्रशासकीय मंजुरीमुळे पारनेरच्या ग्रामीण भागातील रस्ते विकासाच्या कामांना भक्कम आर्थिक आधार मिळाला असून, आगामी काळात या कामांमुळे गावागावांतील दळणवळण अधिक सुखकर आणि गतिमान होईल .
– आ. काशिनाथ दाते सर (विधानसभा सदस्य)
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
🔹 “निघोज जिल्हा परिषद गटातील रस्त्यांच्या विकासासाठी तब्बल १५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळणे ही केवळ विकासकामांची मंजुरी नसून, ग्रामीण जनतेच्या अपेक्षांना मिळालेला न्याय आहे. आमदार काशिनाथ दाते सर यांनी जनतेच्या प्रश्नांना केवळ ऐकून न घेता, त्यांचा सातत्याने पाठपुरावा करून ते प्रत्यक्षात मार्गी लावण्याची आपली बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. निघोजसह परिसरातील वाड्या-वस्त्यांच्या दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने या निर्णयाचा आनंद प्रत्येक ग्रामस्थाच्या मनाला स्पर्श करणारा आहे. विकासाची ही गती अशीच कायम राहावी आणि आपल्या भागातील प्रत्येक रस्ता, प्रत्येक वस्ती मुख्य प्रवाहाशी जोडली जावी, हीच जनतेची अपेक्षा आहे. आमदार दाते सरांच्या या प्रयत्नांसाठी निघोज जिल्हा परिषद गटातील जनतेच्या वतीने मनःपूर्वक कृतज्ञता.
– सौ.सुधामती कवाद (कार्याध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस अहिल्यानगर)




