आमदार काशिनाथ दाते यांच्या पाठपुराव्याला यश

पारनेर | प्रतिनिधी,

पारनेर तालुक्यातील धोत्रे बु. येथे अधिकृत एस.टी. बस थांबा मंजूर करून नियमित एस.टी. बस थांबविण्याबाबत राज्य परिवहन महामंडळाच्या अहिल्यानगर विभागाकडून सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे धोत्रे परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यासंदर्भात विधानसभा सदस्य काशिनाथ महादू दाते यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे पाठपुरावा केला होता. तसेच ग्रामपंचायत कार्यालय धोत्रे बु. यांच्या वतीनेही बस थांब्यासाठी निवेदन देण्यात आले होते.

अहिल्यानगर विभागाच्या विभाग नियंत्रक कार्यालयाने दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी कळविलेल्या पत्रानुसार, नगर-कल्याण महामार्गावरील धोत्रे, ता. पारनेर येथे एस.टी. बस थांबा मंजूर करून नियमित बस थांबविण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.

पत्रात संबंधित मार्गावरून जाणाऱ्या सर्व रा.प. बसेसना धोत्रे येथे थांबवून प्रवाशांची चढ-उताराची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आगार व्यवस्थापकांना कळविण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे धोत्रे बु. व परिसरातील विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक तसेच दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना एस.टी. बससेवेचा मोठा फायदा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *