स्नेहालय उडान प्रकल्प….

बालविवाह का रोखायचा…? हा प्रश्न आज केवळ कायद्याचा नाही, तर समाजाच्या अंतरात्म्याला विचारणारा प्रश्न आहे. आज आपण एका विचित्र विरोधाभासात जगत आहोत. एका बाजूला मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत अशी चर्चा होते, तर दुसऱ्या बाजूला मुलीचा जन्म होण्याआधीच तिच्या अस्तित्वाला नाकारले जाते. मुलगी जन्माला आली की घरात आनंदाचे फटाके फुटत नाहीत, तर वातावरणात एक अनामिक शांतता पसरते. “ओझं आहे”, “जबाबदारी आहे”, “मोठं संकट आहे” – अशा शब्दांनी तिच्या आयुष्याची सुरुवात होते. ज्या घरात तिच्या पहिल्या रडण्यावर हसू उमलायला हवं होतं, तिथे काळजी, भीती आणि नाराजी उमटते. आणि मग ती मोठी होत जाते तशी तिच्याबद्दलची भीतीही मोठी होत जाते.

आजच्या वर्तमानपत्रांमध्ये आपण जे वाचतो ते अंगावर शहारे आणणारे आहे – बापानेच मुलीवर अत्याचार केला, शिक्षकांनी विद्यार्थिनीवर बलात्कार केला, डॉक्टरांनी तपासणीच्या नावाखाली शोषण केले. या घटना केवळ बातम्या नसतात; त्या समाजाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभं करतात. मुलगी घरात सुरक्षित नाही, शाळेत सुरक्षित नाही, समाजातही सुरक्षित नाही – ही भीती पालकांच्या मनात खोलवर घर करून बसली आहे. आणि जेव्हा एखाद्या गावातून एखादी मुलगी पळून जाते, प्रेमाच्या नावाखाली घर सोडते, तेव्हा प्रत्येक पालकाच्या मनात भीतीचा ज्वालामुखी पेटतो – “आपली मुलगीही असंच काही करेल का?” पंधरा वर्षांचं जपलेलं प्रेम दोन महिन्यांच्या आकर्षणासमोर हरवेल का? या भीतीतून, या असुरक्षिततेतून एक चुकीचा निष्कर्ष काढला जातो – “लवकर लग्न लावून दिलं की सगळे प्रश्न सुटतील.”

पालकांना वाटतं, बालविवाह म्हणजे सुरक्षितता. लग्न झालं की मुलीकडे पाहण्याच्या नजरा बदलतील, समाजाचा दबाव कमी होईल आणि आपली जबाबदारी संपेल. मुलीने चुकीचं पाऊल उचलू नये म्हणून तिचं आयुष्यच एका वेगळ्या वळणावर ढकललं जातं. पण हा निर्णय खरंच तिच्या भल्यासाठी असतो का, की तो आपल्या भीतीचा परिणाम असतो? आज डिजिटल क्रांतीच्या काळात मुलं मोबाईलच्या पडद्यावरचं काल्पनिक जग जगत आहेत. त्यांना प्रेमाची, कौतुकाची, संवादाची भूक आहे. पण पालकांकडे वेळ नाही, ऐकून घेण्याची तयारी नाही, भावनिक जवळीक नाही. घरात न मिळालेला संवाद आणि आधार बाहेर कोणी तरी देतो – तिच्या समस्या ऐकतो, तिची स्तुती करतो, तिच्या भावना समजून घेतो. हळूहळू ती त्या आकर्षणात अडकते. त्या क्षणी आई-वडिलांचं वर्षानुवर्षांचं प्रेम तिच्या मनात मागे पडतं, कारण त्या नात्यात संवादाचा पूल उभाच राहिलेला नसतो.

जेव्हा पालकांना हे कळतं, तेव्हा उपाय म्हणून शाळा बंद केली जाते, तिला घरात कोंडून ठेवलं जातं आणि शेवटी तिचं लग्न लावून दिलं जातं. दोष तिच्यावर टाकला जातो. पण खरंच दोष तिचा असतो का? की प्रेम, संवाद आणि विश्वास यांची कमतरता ही खरी कारणं असतात? बालविवाहानंतरचं वास्तव मात्र फार वेगळं असतं. ज्या वयात तिला शिक्षण, स्वप्नं आणि करिअर हवं असतं, त्या वयात ती संसाराच्या ओझ्याखाली दडपली जाते. तिला संसार काय असतो हे माहीत नसतं, नातं कसं जपायचं हे समजलेलं नसतं. प्रत्येक अपेक्षा तिच्याकडून पूर्ण व्हावी अशी मागणी होते. आणि जेव्हा त्या अपेक्षा भंगतात, तेव्हा सुरू होतो मानसिक छळ, शारीरिक अत्याचार, लैंगिक शोषण. तिचं आयुष्य जिवंत नरक बनतं. दोन-तीन वर्षांतच ती माहेरी परत येते. आयुष्यभरासाठी लावलेलं लग्न काही वर्षांत मोडतं. “लग्न करणे सोपे आहे, पण ते निभावणे कठीण आहे” ही म्हण इथे खरी ठरते.

म्हणूनच आजच्या समस्येचा उपाय लग्न नाही. मुलीची सुरक्षितता हा प्रश्न आहे, पण त्याचं उत्तर बालविवाह नाही. उलट बालविवाह हा भविष्यातील मोठ्या दुःखाचं निमंत्रण आहे. तो शिक्षण हिरावतो, स्वप्नं मोडतो, आरोग्य धोक्यात आणतो आणि आत्मविश्वास नष्ट करतो. सुरक्षिततेच्या नावाखाली आपण तिचं बालपण, तिचं तारुण्य आणि तिचं भविष्य हिरावून घेतो. आपण तिचं आयुष्य वाचवत नाही, तर तिच्या आयुष्याला कैद करत असतो.

मुलगी ही ओझं नाही, ती संधी आहे. ती घराचा मान आहे, समाजाची शक्ती आहे, राष्ट्राचं भविष्य आहे. तिच्यावर नियंत्रण ठेवून नव्हे, तर तिच्यावर विश्वास ठेवून आपण तिला सुरक्षित करू शकतो. संवाद, प्रेम, शिक्षण, भावनिक आधार आणि कायद्याची काटेकोर अंमलबजावणी – हाच खरा मार्ग आहे. भीतीतून घेतलेला निर्णय कधीच सुख देत नाही. म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारूया – आपण मुलीचं लग्न तिच्या सुरक्षिततेसाठी लावतो आहोत की समाजाच्या भीतीपासून स्वतःची सुटका करण्यासाठी? जर आपण खरंच मुलीवर प्रेम करत असू, तर तिचं बालपण हिरावून घेणारा कोणताही निर्णय आपण घेणार नाही. बालविवाह हा उपाय नाही; तो एका निरागस आयुष्याच्या हळूहळू होणाऱ्या विनाशाची सुरुवात आहे.


लेखक…✍️
प्रविण कदम
प्रकल्प व्यवस्थापक 
स्नेहालय उडान प्रकल्प 
मो 9011026495

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *