पारनेर / भगवान गायकवाड,
पारनेर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (PTMPA) यांच्या वतीने दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेला भव्य सांस्कृतिक महोत्सव “स्पंदन २०२५” अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात व यशस्वीरीत्या पार पडला. पीटीएमपीए सदस्य, त्यांचे कुटुंबीय व मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एम यु एच एस चे परीक्षा प्रबंधक डॉ.संदीप कडू पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पारनेरचे पोलीस निरीक्षक श्री संतोष खेडकर साहेब,डॉ.संतोष गीते ,डॉ.सचिन पांडुळे ,डॉ.आकाशकिरण सोमवंशी ,डॉ. सुरज कोळपे , डॉ. गणेश गीते,डॉ. हिरामण चोरे यांची उपस्थिती होती.
स्पंदन २०२५ या कार्यक्रमात लावणीचा ठसका, पारंपरिक व आधुनिक नृत्यप्रकार, आकर्षक फॅशन शो, प्रभावी नाट्यप्रयोग तसेच महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध कलाविष्कार सादर करण्यात आले. प्रत्येक सादरीकरणाने प्रेक्षकांची मनापासून दाद मिळवली.
या कार्यक्रमास पीटीएमपीएचे ज्येष्ठ सदस्य, पदाधिकारी व मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती लाभली. त्यांनी आयोजक समितीचे कौतुक करत सहभागी कलाकारांचे अभिनंदन केले. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते संघटनेने तयार केलेल्या नवीन वर्षाच्या डायरीचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी बोलताना पीटीएमपीए अध्यक्ष डॉ.संदीप औटी यांनी सांगितले की, स्पंदन २०२५ हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नसून डॉक्टरांमधील आपुलकी, एकोपा व ताणतणावातून मुक्त होण्यासाठीचे व्यासपीठ आहे. अशा उपक्रमांमुळे संघटनेतील बंध दृढ होतात.
कार्यक्रमाच्या शेवटी सामूहिक छायाचित्रण व सदस्यांमधील संवादाने व स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता आनंदी वातावरणात झाली. स्पंदन २०२५ हा पीटीएमपीएच्या इतिहासातील एक अविस्मरणीय व यशस्वी उपक्रम ठरला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष डॉ.संदीप औटी,उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र वाकळे,सचिव डॉ.पांडुरंग थोरात ,सहसचिव डॉ. सुशील पादिर, खजिनदार डॉ.अरविंद नांगरे व वर्किंग कमिटीच्या सदस्यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे सचिव डॉ.पांडुरंग थोरात यांनी केले.
टाकळी ढोकेश्वर चे संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. भाऊसाहेब खिलारी यांनी आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर “नटसम्राट “हा एकपात्री प्रयोग गाजवला.
🔶🔶🔶🔶
मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर संदीप कडू पाटील म्हणाले, प्रत्येक डॉक्टरांनी स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ काढला पाहिजे व प्रत्येक दिवशी काही ना काही व्यायाम केला पाहिजे. डॉक्टर व पेशंट यांचा संवाद किती महत्त्वाचा आहे याविषयी त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. वैद्यकीय व्यवसाय करत असताना प्रामाणिकपणाला तसेच कागदपत्रांना किती महत्त्व आहे याचे मार्गदर्शन केले.




