प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात;महिलांची मोठी कुचंबणा
पारनेर / भगवान गायकवाड,
पारनेर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्याने दररोज हजारो नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शासकीय कामासाठी येणाऱ्या लोकांची येथे मोठी वर्दळ असते. मात्र, शहरात येणाऱ्या या नागरिकांना सध्या एका भीषण समस्येचा सामना करावा लागत आहे. पारनेर नगरपंचायत क्षेत्रातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ही स्वच्छतागृहे दुर्गंधी आणि अस्वच्छतेच्या विळख्यात सापडली आहेत.
शहरातील मुख्य ठिकाणे जसे की बसस्थानक चौक, बाजारतळ आणि तहसील कार्यालय परिसर, या ठिकाणच्या स्वच्छतागृहांची अवस्था पाहवत नाही. अनेक दिवसांपासून या स्वच्छतागृहांमध्ये पाण्याची कोणतीही सोय नसल्याने कमालीची दुर्गंधी सुटली आहे. नागरिकांना नाक दाबून या परिसरातून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः बाजारतळावर येणाऱ्या शेतकऱ्यांना आणि तहसील कार्यालयात कामासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या मोठी आहे. शहरात एकही स्वच्छतागृह वापरण्यायोग्य नसल्याने महिला आणि विद्यार्थिनींची मोठी कुचंबणा होत आहे. स्वच्छतेअभावी जंतू संसर्ग होऊन आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. एकीकडे सरकार ‘स्वच्छ भारत अभियाना’वर कोट्यवधी रुपये खर्च करत असताना, पारनेर नगरपंचायत मात्र या मूलभूत सुविधेकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचे चित्र दिसत आहे.नगरपंचायत प्रशासनाकडे यापूर्वी अनेकदा तोंडी तक्रारी करण्यात आल्या आहेत, मात्र परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. स्वच्छतागृहांच्या नियमित देखभालीसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती का केली जात नाही? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. नगरपंचायत केवळ कागदावरच स्वच्छतेचे दावे करत असून प्रत्यक्ष जमिनीवर मात्र नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत.जर येत्या काही दिवसांत या स्वच्छतागृहांची दुरुस्ती आणि स्वच्छता न झाल्यास, प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
🔶🔶🔶🔶🔶🔶
शहरात कामानिमित आल्यावर स्वच्छतागृहाचा वापर करणे अशक्य झाले आहे. सगळीकडे घाण आणि दुर्गंधी पसरलेली आहे. नगरपंचायतने याकडे तातडीने लक्ष न दिल्यास नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होईल.
– एक त्रस्त नागरिक.




