पारनेर / भगवान गायकवाड,
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत रेनवडी गावाची निवड करण्यात आली असून, या अभियानांतर्गत आयोजित गाव भेट दौऱ्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने राबविलेल्या ‘एक विद्यार्थी – एक फळझाड’ या अभिनव उपक्रमाचा गौरव करण्यात आला. प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम आणि अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या हस्ते १०० व्या कल्पवृक्षाची लागवड करून या उपक्रमाची दिमाखात शतकपूर्ती करण्यात आली.
प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून विकासकामांचा आढावा
या विशेष दौऱ्याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, आणि पारनेरचे गट विकास अधिकारी (उ. श्रे.) दिलीप सोनकुसळे उपस्थित होते. मान्यवरांनी सर्वप्रथम रेनवडी ग्रामपंचायतीमार्फत गावात सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली. गावाचा कायापालट करण्यासाठी सुरू असलेल्या नियोजनाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. रेनवडी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने शाळा परिसर आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना १०० फळझाडांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत शंभरावे झाड लावण्याचा मान भाऊ कदम आणि आनंद भंडारी यांना देण्यात आला. “प्रत्येक विद्यार्थ्याने एका झाडाची जबाबदारी घ्यावी,” हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
भाऊ कदम यांचा विद्यार्थ्यांशी संवाद…
यावेळी अभिनेते भाऊ कदम यांनी शाळेतील परसबागेची बारकाईने पाहणी केली. त्यांनी विद्यार्थ्यांशी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संवाद साधला. “केवळ झाडे लावणे पुरेसे नाही, तर ती पोटच्या गोळ्याप्रमाणे जगवणे महत्त्वाचे आहे,” अशा शब्दांत त्यांनी निसर्ग संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. भाऊ कदम यांच्या उपस्थितीमुळे आणि त्यांच्या मिश्किल संवादामुळे विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी रेनवडीतील ग्रामस्थांसह मुंबई आणि पुणे येथील नोकरदार मंडळानेही मोठे योगदान दिले. मुख्याध्यापक मच्छिंद्रनाथ पावडे, शिक्षक वृंद आणि शालेय व्यवस्थापन समितीने या उपक्रमाचे नियोजन केले होते. याप्रसंगी मार्गदर्शक भिवसेनशेठ येवले, सरपंच श्रीकांतशेठ डेरे, उपसरपंच कांचनताई येवले, चेअरमन मुकेशशेठ डेरे, बाबासाहेब येवले, ग्रामसेवक हरिश्चंद्र काळे व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
निसर्ग आणि शिक्षणाची सांगड….
जिल्हा परिषद शाळेने राबवलेला हा उपक्रम केवळ पर्यावरण रक्षणापुरता मर्यादित नसून, त्यातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून विज्ञानाचे आणि निसर्गाचे धडे मिळत आहेत. रेनवडी गाव आता खऱ्या अर्थाने ‘समृद्ध पंचायतराज’च्या दिशेने पाऊले टाकत असून, जिल्ह्यासाठी हा एक आदर्श नमुना ठरत आहे, असे गौरवद्गार मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी काढले.






