उपमुख्यमंत्री पवार व जलसंपदामंत्री विखे पाटील यांच्या बैठकीत निर्णय
पारनेर / ता. प्रतिनिधी,
पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत आमदार काशिनाथ दाते सर यांनी केलेल्या आग्रही पाठपुराव्याला यश आले आहे. कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन पूर्वनियोजित १२ नोव्हेंबरऐवजी आता ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना वेळेत पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत कुकडी प्रकल्पाच्या सन २०२६-२७ च्या पाणी नियोजनासंदर्भात आज, २७ ऑक्टोबर रोजी मुंबई येथील मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जलसंपदा विभागाचे मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कुकडी डाव्या कालव्याच्या आवर्तनाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
संबंधित विभागाकडून यापूर्वी १२ नोव्हेंबर रोजी आवर्तन सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची गरज आणि रब्बी हंगामातील पिकांची परिस्थिती लक्षात घेता आमदार काशिनाथ दाते सर यांनी आवर्तन लवकर सोडण्याची आग्रही मागणी केली. शेतकऱ्यांच्या अडचणींची वस्तुस्थिती बैठकीत मांडत त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आवर्तनाची तारीख सात दिवसांनी पुढे आणण्यात यश आले आहे.
नव्या निर्णयानुसार ५ नोव्हेंबरपासून सुरू होणारे हे आवर्तन पुढील ३५ दिवस चालणार असून, ते रब्बी हंगामासाठी असणार आहे. त्यानंतर सोडण्यात येणारी आवर्तने मात्र दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले. यावेळी आमदार दाते सरांसह इतर मान्यवरांनी कुकडी लाभक्षेत्रातील केटीवेअर भरून देण्याच्या केलेल्या आग्रही मागणीवर मंत्री विखे पाटील यांनी सकारात्मकता दर्शवत अधिकाऱ्यांना तशा प्रकारच्या सूचना दिल्या.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार, जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील, आमदार काशिनाथ दाते सर, आमदार विक्रम पाचपुते, आमदार माऊली आबा कटके, आमदार शरद दादा सोनवणे, कुकडी सिंचन मंडलाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, कार्यकारी संचालक कृष्णा खोरे चोपडे, कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक 1 नारायणगावचे कार्यकारी अभियंता नान्नोर, कार्यकारी अभियंता घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते.
दुष्काळी परिस्थिती, पाण्याची वाढती गरज आणि रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन या पार्श्वभूमीवर आवर्तन वेळेत सुरू होणे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.




