पिंपळगाव रोठा येथे १ कोटी ४९ लाखांच्या कामांचे भूमिपूजन संपन्न 

पारनेर / प्रतिनिधी,   
पारनेर–नगर विधानसभा मतदारसंघातील पिंपळगाव रोठा येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजनाचा समारंभ पारनेर–नगर मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सरांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. या वेळी गावातील पायाभूत सुविधांसाठी सुमारे १ कोटी ४९ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

या अंतर्गत ग्रामपंचायत आवारातील परिसर सुधारणा, विविध वस्ती मार्गांचे डांबरीकरण व रस्ता सुधारणा, पिंपळगाव रोठा येथील सभामंडपाचे काम, मंदिर परिसर सुधारणा तसेच पिंपळगाव रोठा – आव्हाड वस्ती ते पिंपळवाडी रस्ता सुधारणा अशी विविध कामे हाती घेण्यात येणार आहेत. याशिवाय पिंपळगाव रोठा (कान्हूर पठार) येथील उपसा सिंचन योजनेच्या सुमारे १२ हजार २४० हेक्टर क्षेत्राच्या सर्वेक्षणासाठी ६० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.


या प्रसंगी बोलताना आमदार दाते म्हणाले की, “गावाच्या सर्वांगीण विकासासाठी समविचारी व विकासाभिमुख नेतृत्वाला संधी देणे आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत विकासाभिमुख पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. मतदारसंघातील विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही.”

पारनेर तालुक्यातील प्रस्तावित सिंचन प्रकल्पांच्या सर्वेक्षणासाठी शासनाकडून निधी उपलब्ध झाला असून पिंपळगाव रोठा व परिसरातील सिंचन योजनेमुळे भविष्यात या भागातील शेतीला मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून या योजना लवकरच पूर्णत्वास जातील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करत मतदारसंघाच्या विकासासाठी मोठे योगदान देणारे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची आठवण काढत त्यांनी सांगितले की, “या मतदारसंघाच्या परिवर्तनाचे शिल्पकार असलेले अजितदादा आज आपल्या सोबत नाहीत, ही खंत मनात कायम राहते.”

यावेळी त्यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात नागरिकांच्या हितासाठी करण्यात आलेल्या विविध तरतुदींचाही उल्लेख केला. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान, ग्रामीण भागातील रस्ते व पायाभूत सुविधांसाठी वाढीव निधी, सिंचन प्रकल्पांना गती तसेच महिला व युवकांसाठी विविध योजना यांचा लाभ मतदारसंघातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करत या मतदारसंघातील शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग, महिला भगिनी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देण्याची भूमिका मी गेल्या चाळीस वर्षांच्या राजकीय वाटचालीत सातत्याने घेतली आहे आणि पुढेही घेत राहीन, असेही आमदार दाते यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाला ॲड. पांडुरंग गायकवाड, मा. चेअरमन बाबासाहेब खिलारी, कार्याध्यक्ष पंढरीनाथ उंडे, उद्योजक देवराम मगर, डॉ. प्रदीप दाते, धनंजय निमसे, सुभाष ठाणगे सर, सरपंच संजीवनी आंधळे, शुभम गोरडे, उपसरपंच दादाभाऊ पुंडे, भाऊ पावडे, अरुण राजदेव, गोपी घुले, प्रदीप खोसे, जालिंदर खोसे आदी मान्यवरांसह पिंपळगाव रोठा व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🔶🔶🔶🔶🔶🔶
 “पारनेर–नगर विधानसभा मतदारसंघात आमदार काशिनाथ दाते सरांच्या माध्यमातून सुरू असलेला विकास आज सर्वांच्या डोळ्यांसमोर आहे. त्यांच्या ठाम नेतृत्वामुळे मतदारसंघातील अवैध व्यवसाय, दहशत, दादागिरी आणि गुंडगिरीला मोठ्या प्रमाणात आळा बसला असून सर्वदूर शांतता आणि कायद्याचे राज्य निर्माण झाले आहे. विकासाच्या बरोबरीने सुरक्षित वातावरण निर्माण करणे ही मोठी गोष्ट असून आमदार दाते यांनी ती प्रत्यक्षात करून दाखवली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून मतदारसंघ प्रगतीच्या नव्या वाटेवर पुढे जात आहे.” 

– ॲड. बाबासाहेब खिलारी (मा.चेअरमन, खरेदी विक्री संघ)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *