पारनेर / भगवान गायकवाड,
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, १४ जानेवारी ते २८ जानेवारी २०२६ या कालावधीत राज्यभर ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
या अभियानाचा एक भाग म्हणून शहाजापूर येथील कौडेश्वर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने विशेष निबंध आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात शहाजापूर जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आपली कल्पकता कागदावर उतरवली.मातृभाषेची गोडी लागावी, विद्यार्थ्यांमध्ये वाचन आणि लेखनाची आवड निर्माण व्हावी, या उदात्त हेतूने कौडेश्वर वाचनालय नेहमीच कार्यरत असते. मंगळवारी आयोजित या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (गावठाण) आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (माळवाडी) या दोन्ही शाळांमधील तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ग्रंथालयातील शांत आणि प्रसन्न वातावरणात हे विद्यार्थी अभ्यासाव्यतिरिक्त सृजनशील कामात रंगून गेल्याचे पाहायला मिळाले.निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना दोन ते तीन विषय देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न वापरता, स्वतःच्या मनातील भावना आणि कल्पना वापरून निबंध लेखन केले. चिमुकल्या हातांनी शब्दांची केलेली ही गुंफण पाहून उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले. निबंधासोबतच ‘चित्ररंगवा’ स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी विविध रंग भरून आपली कला सादर केली. चित्र रंगवताना आणि निबंध लिहिताना विद्यार्थी पूर्णपणे एकरूप झाले होते, असे दृश्य यावेळी दिसून आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रंथपाल सुरेंद्र शिंदे यांनी सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे स्वागत केले. त्यांनी मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागणे अत्यंत आवश्यक आहे. अशा स्पर्धांमुळे मुलांच्या मनात भाषेबद्दल आत्मविश्वास निर्माण होतो.”या प्रसंगी मुख्याध्यापिका श्रीमती अर्चना हंडोरे यांनी वाचनालयाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाला स्मिता कोकाटे, निर्मला वाघ, किरण पवार सर, आकाश मोटे, विनायक म्हस्के, ऋषिकेश मोटे आणि विनायक मोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
वाचनालयाचा स्तुत्य उपक्रम…
शहाजापूरचे कौडेश्वर वाचनालय केवळ पुस्तके उपलब्ध करून न देता, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असते. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने घेतलेल्या या स्पर्धेमुळे गावातील शैक्षणिक वातावरणात चैतन्य निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मातृभाषेतून व्यक्त व्हावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश यशस्वी होत आहे.





