विधानसभेत आ. दातेंचा घणाघाती सवाल

पारनेर / ता. प्रतिनिधी  

शनिवार दि. २८ फेब्रुवारी २०२६ सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ मध्ये पारनेर–नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांनी नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात एमआयडीसी परिसरातील ‘प्रतिमा प्रिंटर्स’ येथे बालभारतीची बनावट पाठ्यपुस्तके छापली जात असल्याच्या गंभीर प्रकरणावर तारांकित प्रश्न उपस्थित केला. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या संवेदनशील मुद्द्यावर सभागृहाचे लक्ष वेधत त्यांनी शासनाकडून स्पष्ट भूमिका मांडण्याची मागणी केली.

शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी उत्तर देताना सांगितले की, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) अधिकृत कंत्राटदारांमार्फतच पाठ्यपुस्तके छापते. मात्र नागपूर येथे संबंधित मुद्रणालयात मोठ्या प्रमाणावर बनावट पुस्तकांची छपाई होत असल्याचे डिसेंबर २०२५ मध्ये निदर्शनास आले होते. या कारवाईदरम्यान इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या सुमारे २० हजारांहून अधिक बनावट पुस्तकांचा साठा जप्त करण्यात आला असून संबंधित मुद्रणालयाविरोधात १७ डिसेंबर २०२५ रोजी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच संबंधित मालकाला अटक करून साठा जप्त करण्यात आल्याची माहिती मंत्र्यांनी दिली.

यासोबतच राज्यातील इतर ठिकाणी अशा प्रकारच्या अवैध छपाईला आळा घालण्यासाठी सर्व खासगी प्रिंटिंग प्रेसची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अधिकृत व बनावट पुस्तकांतील फरक ओळखता यावा यासाठी यावर्षीपासून बालभारतीच्या पुस्तकांवर विशेष क्यूआर कोड छापण्यात येणार असून विद्यार्थ्यांना, पालकांना व पुस्तक विक्रेत्यांना जनजागृतीद्वारे माहिती देण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला बाधा आणणाऱ्या आणि पालकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या या प्रकारावर कठोर कारवाई व्हावी, यासाठी आमदार काशिनाथ दाते यांनी सभागृहात आवाज उठवला. त्यांच्या प्रश्नामुळे शासनाने घेतलेल्या कारवाईची सविस्तर माहिती समोर आली असून बनावट पुस्तकांवर आळा बसण्यासाठी ठोस पावले उचलली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आमदार दाते यांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *