विद्यार्थिनी व महिलांच्या सुरक्षेवर भर


पारनेर/ ता. प्रतिनिधी, 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला तालुकाध्यक्षा सुषमा रावडे यांनी विद्यार्थिनी व महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पारनेर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात स्वतंत्र निर्भया पथक स्थापन करून ते प्रभावीपणे कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर केले.

महिला सक्षमीकरण, सामाजिक प्रश्नांबाबत सातत्याने पाठपुरावा आणि महिलांच्या हक्कांसाठी सक्रियपणे काम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला तालुकाध्यक्षा सुषमा रावडे यांनी ही मागणी पुढे आणली आहे. तालुक्यातील विद्यार्थिनी, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

निवेदनात पारनेर पोलीस स्टेशन अंतर्गत निर्भया पथकाची तातडीने स्थापना करून त्याचे नियमित गस्त व जनसंपर्क उपक्रम राबविण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच तालुक्यातील प्रमुख चौक, सार्वजनिक ठिकाणे, शासकीय कार्यालये, बसस्थानके आणि गर्दीच्या परिसरांमध्ये निर्भया पथकाची माहिती, संपर्क क्रमांक आणि कार्यपद्धती दर्शविणारे माहितीफलक व बॅनर्स लावण्यात यावेत, असेही नमूद करण्यात आले आहे.

महिलांमध्ये आणि विद्यार्थिनींमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी माहितीपत्रकांचे वितरण करण्यात यावे, तसेच शाळा व महाविद्यालयांमध्ये महिला सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शनपर कार्यक्रम, जनसंवाद उपक्रम, प्रबोधनपर सत्रे आणि कायदेशीर हक्कांविषयी जनजागृती मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.

याशिवाय फेसबुक, व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया माध्यमांद्वारे निर्भया पथकाची माहिती, संपर्क क्रमांक आणि नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या सेवांचा सातत्याने प्रचार-प्रसार करण्यात यावा, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत महिलांना त्वरित मदत मिळू शकेल, असेही रावडे यांनी म्हटले आहे.

निवेदन सादर करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती तालुकाध्यक्षा अपर्णा खामकर, महिला शहराध्यक्षा कविता औटी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होत्या. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली


 
🔶🔶🔶🔶🔶🔶
सध्या विद्यार्थिनी व महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा बनला आहे. महिलांना निर्भयपणे शिक्षण, नोकरी आणि दैनंदिन व्यवहार करता यावेत यासाठी प्रभावी सुरक्षा यंत्रणा आवश्यक आहे. पारनेर तालुक्यात निर्भया पथकाची स्थापना झाल्यास महिलांना तातडीची मदत मिळेल, तसेच छेडछाड, अत्याचार आणि महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यास मदत होईल. पोलीस प्रशासनाने या मागणीची सकारात्मक दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी आमची अपेक्षा आहे.

– सुषमा रावडे (तालुकाध्यक्षा : राष्ट्रवादी महिला काँग्रेस, पारनेर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *