पारनेर / ता. प्रतिनिधी, 

कान्हुर पठार ता. पारनेर महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत आयोजित “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर” आज उत्साहात व मोठ्या प्रतिसादात पार पडले. या शिबिरात पारनेर–नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांनी जनतेच्या समस्या थेट ऐकून त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश देत प्रशासनाला अधिक लोकाभिमुख होण्याचे आवाहन केले.

यावेळी आमदार दाते म्हणाले, “शासनाच्या योजना व सेवा या कागदावर न राहता थेट जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. गावपातळीवर अशा शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी जागेवरच सोडवणे, हेच प्रशासनाचे खरे यश आहे. महसूल, कृषी, परिवहन, आरोग्य, शिक्षण, सहकार अशा विविध विभागांनी एकत्र येऊन जनतेला दिलासा देण्याचा हा उपक्रम अत्यंत उपयुक्त आहे.”

ते पुढे म्हणाले, “शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या तात्काळ मार्गी लावण्यासाठी अशा शिबिरांची गरज आहे. शासन जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध असून प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी समन्वयाने काम केले पाहिजे. शासनाच्या योजना थेट जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी जागेवरच सुटल्या पाहिजेत. अशा शिबिरांमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळत असून शासनाच्या ह्या उपक्रमाची फलश्रुती सर्वसामान्य नागरिकांच्या समाधानात शोधल्यास निच्छितच सापडत असून एक जनतेचा प्रतिनिधी म्हणुन ह्या गोष्टीचा मला मनस्वी आनंद आहे.”

या शिबिरात भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव चेडे, तहसीलदार गायत्री सौंदाने, तालुका कृषी अधिकारी गजानन घुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर, स्वप्नील ठुबे, अर्जुन नवले, संतोष ठुबे, बाबा चेडे, रमेश गाडगे यांसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

तसेच सेतू केंद्र चालक, संजय गांधी योजना शाखा, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, वनविभाग, सामाजिक वनीकरण, बचत गट, भूमिअभिलेख, प्राथमिक आरोग्य केंद्र, शिक्षण, सहकार, दुय्यम निबंधक आदी विभागांचे प्रतिनिधी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घेतला.

या शिबिरातून अनेक नागरिकांच्या समस्या जागेवरच निकाली काढण्यात आल्या असून तालुक्यातील इतर मंडलांसाठी ज्या ज्या वेळी ह्या शिबिराचे आयोजन करण्यात येईल त्या त्या वेळी सबंधित मंडलातील नागरिकांनी आपल्या शासन दरबारी असलेल्या समस्या सोडविण्यासाठी लाभ घ्यायला हवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *