पारनेर / भगवान गायकवाड, 
बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथेचे समाजातून समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि बालकांचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी पारनेर तालुक्यातील आदर्श करंदी गावाने ‘बालविवाह मुक्त गाव’ करण्याचा ठाम निर्धार केला आहे. या अनुषंगाने जनजागृती करण्यासाठी स्नेहालय संस्था संचलित ‘उडान’ प्रकल्पाच्या वतीने करंदी गावाला सदिच्छा भेट देण्यात आली. यावेळी आयोजित विशेष बैठकीत गावाला बालविवाह मुक्त करण्यासाठी ग्रामस्थ आणि प्रशासनाने एकत्र येऊन काम करण्याचा संकल्प सोडला.

या महत्त्वपूर्ण बैठकीला स्नेहालय संचलित उडान प्रकल्पाचे व्यवस्थापक प्रवीण कदम, करंदी गावच्या लोकनियुक्त सरपंच नंदा भास्कर गव्हाणे, ग्रामसेवक सेक्सपिअर भाऊसाहेब, उपसरपंच अर्जुन ठाणगे, तंटामुक्ती अध्यक्ष राधुजी ठाणगे, मळगंगा देवस्थानचे अध्यक्ष शिवाजी ठाणगे आणि उपाध्यक्ष जिजाभाऊ थोरात प्रामुख्याने उपस्थित होते.

याशिवाय भास्कर गव्हाणे, स्नेहआधारचे शाहिद शेख, समन्वयक पूजा दहातोंडे, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत शिंदे, भगवान गायकवाड, श्रीधर गांगड, पांडुरंग ठाणगे, भाऊसाहेब गांगड, पाटीलबा ठाणगे, गणेश चौधरी, भूषण थोरात, पांडुरंग पिंपरकर, अलका केदार, सोनाली चौधरी, ललिता पिंपरकर, लता ठाणगे, सिंधूबाई ठाणगे, भाऊ गाडेकर, कारभारी रोकडे, महिला सी.आर.पी. एकविरे, विमल चौधरी, दीपा ठाणगे, विमल क्षीरसागर, माधुरी औटी, दीपाली थोरात, सुभद्रा क्षीरसागर, अंगणवाडी सेविका गोरे, शेख, मनिषा चौधरी, ज्योती उघडे, सविता ठाणगे आदींसह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       बैठकीत उडान प्रकल्पाचे व्यवस्थापक प्रवीण कदम यांनी उपस्थितांना ‘बालविवाह प्रतिबंधक अभियान’ अंतर्गत सुरू असलेल्या कामांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी बालकांसाठी अस्तित्वात असलेले कायदे, त्यांचे हक्क आणि बालकांचे अधिकार संरक्षित करणे किती गरजेचे आहे, यावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. बालविवाहामुळे मुलींच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांची जाणीव त्यांनी करून दिली. तसेच बालविवाह पीडित बालकांना तातडीने काळजी, संरक्षण आणि पुनर्वसनाच्या संधी मिळवून देणे हे संपूर्ण समाजाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.अहिल्यानगर जिल्हा बालविवाह मुक्त करून, ‘बालविवाह मुक्त भारत’ घडवण्याची प्रेरणा संपूर्ण देशात निर्माण करणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठी देशातील अन्य संस्था आणि कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण व संघटन केले जात आहे,” असे प्रतिपादन प्रवीण कदम यांनी केले.

करंदी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच नंदा गव्हाणे आणि उपस्थित ग्रामस्थांनी या मोहिमेला पूर्ण पाठिंबा दर्शवला. गावपातळीवर बालविवाहाबाबत कोणतीही तडजोड न करता, प्रत्येक बालकाला शिक्षणाचा हक्क मिळवून देत करंदी गाव संपूर्ण राज्यासाठी आदर्श बनवू, असा विश्वास यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *