पारनेर / भगवान गायकवाड,
येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय सेंटर व स्नेहालय संचलित उडान प्रकल्प अंतर्गत नुकतेच “दहा कोटी नशामुक्त महाअभियान” मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीविषयी जनजागृती निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. सादिक राजे यांनी, “शालेय स्तरावर व्यसनमुक्तीविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती झाल्यास सुदृढ व व्यसनमुक्त समाज निर्माण होईल,” असा मोलाचा संदेश दिला.
आजची युवा पिढी विविध व्यसनांच्या आहारी जात असताना, त्यांना या मार्गापासून दूर ठेवण्यासाठी हे महाअभियान अत्यंत स्तुत्य आणि काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, आमची शाळा या देशव्यापी अभियानात पूर्ण जोमाने सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नेहमी कटिबद्ध राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला पारनेर परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक व तज्ज्ञ उपस्थित होते. यात प्रामुख्याने ब्रह्माकुमारी साधना दिदी (संचालिका, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, पारनेर सेंटर), डॉ. सादिक राजे, संभाजी मगर (उद्योजक),मीरा पुजारी (योग शिक्षिका),ॲड. शिवाजीराव जाधव,राम भाई, पत्रकार भगवान गायकवाड (स्नेहालय संस्था), देवराम खोडदे, हिराबाई मगर, अरुणा औटी,यांसारख्या अनेकविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून या अभियानाला पाठिंबा जाहीर केला.
ब्रह्माकुमारी साधना दिदींचे प्रास्ताविक व अभियानाची रूपरेषा प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ब्रह्माकुमारी साधना दिदी यांनी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या माध्यमातून देशभरात सुरू असलेल्या ‘नशामुक्त भारताच्या’ कार्याची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पारनेर तालुक्यात ‘दहा कोटी नशामुक्त महाअभियान’ व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे.
या अभियानांतर्गत समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून जनजागृती केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील उपक्रमांचा समावेश असणार आहे शाळा, उच्च माध्यमिक विद्यालय आणि महाविद्यालयांमध्ये विशेष प्रबोधन सत्रे आयोजित करणे, विविध सामाजिक संस्था, पोलीस स्टेशन व ग्रामपंचायतींच्या माध्यमातून जनजागृतीपर कार्यक्रम राबवणे., गावोगावच्या चौकाचौकात फलक लावून आणि व्याख्यानांच्या माध्यमातून व्यसनाचे दुष्परिणाम लोकांसमोर मांडणे.व्यसनमुक्त समाजाची गरज आजच्या धावपळीच्या युगात आणि आधुनिक जीवनशैलीत तरुणाई व्यसनांच्या विळख्यात अडकत चालली आहे, जी मानवी आरोग्यासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत घातक आहे. यावर मात करण्यासाठी केवळ कायदे किंवा पोलिसांची कारवाई पुरेशी नाही, तर तळागाळातील लोकांमध्ये आणि विशेषतः शालेय विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनावर नैतिक मूल्यांचे संस्कार करणे गरजेचे आहे. विद्यार्थी हा देशाचाभावी नागरिक असल्याने, त्याचे बालपण आणि विद्यार्थी दशा व्यसनमुक्त राहिल्यास, भविष्यात संपूर्ण समाज आणि देश व्यसनमुक्त होण्यास नक्कीच मदत होईल, असा सूर या कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आला.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी पारनेर तालुका आणि देश व्यसनमुक्त करण्यासाठी शपथ घेतली व या महाअभियानात हिरिरीने सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शनाने या प्रेरणादायी कार्यक्रमाची सांगता झाली.




