पारनेर तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी निर्णायक पाऊल
पारनेर / ता. प्रतिनिधी,
पारनेर तालुक्यातील राजकीय वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठी बळकटी मिळाली आहे. मंगळवारी, दि. ५ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईतील महिला विकास मंडळ सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आमदार काशिनाथ दाते यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यामुळे तालुक्यातील राजकारणात राष्ट्रवादीची ताकद वाढणार असून, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२५ मध्ये हा प्रवेश निर्णायक ठरू शकतो.
या सोहळ्यात शिवसेना, युवसेना आणि इतर पक्षांतील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यामध्ये शिवसेना उपतालुका प्रमुख पंढरीनाथ उंडे, महाराष्ट्र राज्य वाहतूक सेना उपाध्यक्ष धनंजयशेठ निमसे, युवसेना तालुकाप्रमुख सुभाष सासवडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश रोहकले, माजी पंचायत समिती सदस्य प्रदीप वाळुंज, माजी सरपंच हरीश दावभट, कामटवाडी गावचे सरपंच संतोष मोरे, खादी ग्रामोद्योगचे आण्णासाहेब खैरे, तिखोल गावचे माजी सरपंच सुभाष ठाणगे यांच्यासह अनेक दिग्गजांचा समावेश आहे.
आमदार काशिनाथ दाते यांच्या प्रयत्नांमुळे हा पक्षप्रवेश शक्य झाला असून, त्यांच्या संघटन कौशल्याचे हे उत्तम उदाहरण आहे. त्यांच्या विधानसभेतील विजयानंतर पारनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ‘अच्छे दिन’ आल्याचे चित्र आहे. या प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढली असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. जात, धर्म, वंश न पाहता मेहनती कार्यकर्त्यांना संधी दिली जाते. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेवर पक्षाची वाटचाल सुरू आहे. सर्व समाज घटकांचा विकास हा आमचा ध्यास आहे. नवीन कार्यकर्त्यांनी संधीचं सोनं करावं. राजकारण हे सत्तेसाठी नव्हे, तर समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आहे.” त्यांनी सर्व नवीन कार्यकर्त्यांचं स्वागत करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या पक्षप्रवेश सोहळ्याला माजी खासदार आनंद परांजपे, आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार अमोल मिटकरी, उद्योजक दिलीप दाते, जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, युवा तालुकाध्यक्ष भास्कर शिरोळे यांच्यासह पक्षाचे अनेक मान्यवर उपस्थित होते.
🔶🔶🔶🔶🔶🔶
शिवसेना पक्षात काम करताना अनेक अनुभव घेतले, पण विकासासाठी मर्यादा येत होत्या. अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आमदार काशिनाथ दाते सरांच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासात्मक वाटचालीसाठी ठोस निर्णय घेतले जातात आणि कामाला गती मिळते. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि टाकळी ढोकेश्वर गटाच्या प्रगतीसाठीच मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हा निर्णय वैयक्तिक लाभासाठी नसून जनतेच्या हितासाठी आहे.
– पंढरीनाथ उंडे.
🔶🔶🔶🔶🔶🔶
“उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार काशिनाथ दाते यांचे जनसामान्यांच्या प्रगतीला गती देणारे काम युवावर्गाला आकर्षित करत आहे. माझा पक्षप्रवेश हा सहकाऱ्यांच्या मताचा आदर करून घेतलेला निर्णय आहे. यापुढे दाते साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची विचारधारा तळागाळात पोहोचवण्यासाठी दुप्पट वेगाने काम करणार असल्याचे सुभाष सासवडे यांनी सांगितले.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
“नवीन नेत्यांच्या प्रवेशाने पक्ष अधिक मजबूत होईल. ही नेतृत्वे लोकप्रिय आणि कार्यक्षम आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एकसंघपणे काम करून तालुक्याच्या प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
– प्रशांत गायकवाड, संचालक, जिल्हा बँक अहिल्यानगर:
या पक्षप्रवेशामुळे पारनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढली आहे. आमदार काशिनाथ दाते यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची तयारी केली आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.







