पारनेर/प्रतिनिधी : 
पारनेर तालुक्यातील यादववाडी गावातील शेतकरी साहेबराव नामदेव शेळके यांनी खडी क्रेशरमुळे होणाऱ्या प्रदूषणाला कंटाळून सोमवार, १९ जानेवारी २०२६ पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाने याबाबत कोणतीही दखल न घेतल्याने त्यांना हे पाऊल उचलावे लागले.

यादववाडी परिसरात तीन मोठ्या खडी क्रेशर आणि खाणी कार्यरत आहेत. या खाणींमधून निघणाऱ्या प्रचंड धुळीमुळे साहेबराव शेळके यांच्या गट क्रमांक २७७ मधील राहत्या घरात आणि गट क्रमांक ३०४ मधील फळपिकांवर मोठा परिणाम झाला आहे. पिके पूर्णपणे धोक्यात आली असून, घरातील सदस्यांना श्वसनाचे गंभीर विकार जडले आहेत. खाणींमधील स्फोटांमुळे बोअरचे पाणी बंद पडले असून, पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाली आहे.
शेळके यांनी यापूर्वी शासन, प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे वेळोवेळी लेखी निवेदने दिली आणि पाठपुरावा केला. मात्र, कोणतीही कारवाई झाली नाही. खाण मालकांकडून अरेरावीची भाषा वापरली जाते, तर ग्रामपंचायतीकडूनही दुर्लक्ष केले जाते. या सर्व गोष्टींमुळे कंटाळून त्यांनी सकाळी १० वाजता उपोषणास सुरुवात केली. उपोषण सुरू असून, प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन खडी क्रेशर बंद करावेत आणि प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.

शेळके यांच्या या आंदोलनामुळे स्थानिक परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


🔶🔶🔶🔶🔶🔶
परिसरातील खडी क्रेशर आणि खाणींमधून निघणाऱ्या धुळीने आमचे शेत, फळपिके आणि आरोग्य पूर्णपणे धोक्यात आले आहे. श्वसनाचे आजार, पाण्याची टंचाई निर्माण झाले आहेत प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या निवेदनांकडे दुर्लक्ष केले. आता आमरण उपोषणाशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. प्रदूषण थांबवले नाही तर आमचे जीवनच धोक्यात आहे.

– साहेबराव शेळके (उपोषणकर्ते, यादववाडी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *