पारनेर महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
पारनेर भगवान गायकवाड,
“आजच्या डिजिटल युगात नोकरीच्या शोधासाठी शहरांमध्ये वणवण फिरण्याची गरज उरलेली नाही. केंद्र सरकारचे ‘नॅशनल करिअर सर्व्हिस’ (NCS) आणि राज्य सरकारचे ‘महास्वयम’ पोर्टल हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्याचे महामार्ग आहेत,” असे प्रतिपादन भारत सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयाचे युवा व्यावसायिक वसीम पठाण यांनी केले.
पारनेर येथील महाविद्यालयात करिअर गाईडन्स सेल आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र (अहिल्यानगर) यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ‘करिअर ऑपॉर्च्युनिटीज थ्रू नॅशनल करिअर सर्व्हिस अँड महास्वयम पोर्टल’ या विषयावर पठाण यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.केवळ तात्विक माहिती न देता वसीम पठाण यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष तंत्रज्ञानाशी जोडले. त्यांनी पोर्टलवर प्रभावी प्रोफाईल कशी तयार करावी, बायोडाटा कसा अपलोड करावा आणि क्लिष्ट वाटणारी नोंदणी प्रक्रिया सोप्या पद्धतीने कशी पूर्ण करावी, याचे लाईव्ह प्रात्यक्षिक करून दाखवले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या पोर्टलचा योग्य वापर केल्यास त्यांना देशपातळीवरील नोकरीच्या संधी घरबसल्या उपलब्ध होऊ शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी पठाण यांच्या मार्गदर्शनाचे कौतुक केले. “विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवून समाधान मानू नये. बदलत्या काळानुसार स्वतःला ‘रोजगारक्षम’ बनवण्यासाठी कौशल्य विकासावर भर देणे गरजेचे आहे,” असे आवाहन प्राचार्य आहेर यांनी केले.
याप्रसंगी जिल्हा कौशल्य विकास केंद्राचे वरिष्ठ लिपिक संतोष वाघ यांनी ‘महास्वयम’ पोर्टलच्या तांत्रिक बाबी आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. तुकाराम थोपटे आणि आयक्यूएसी समन्वयक डॉ. दत्तात्रय घुंगार्डे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सागर मस्के, प्रा. मनीष पागिरे आणि प्रा. ज्ञानेश्वर गुलगे यांनी विशेष परिश्रम घेतले. केंद्र सरकारचे प्रतिनिधी थेट ग्रामीण भागात येऊन मार्गदर्शन करत असल्याने पारनेरमधील विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.




