पारनेर | प्रतिनिधी,

पारनेर तालुक्यातील लोणीमावळा व वडझिरे परिसरातील खंडित झालेला वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करण्याचे स्पष्ट निर्देश पालकमंत्र्यांनी संबंधित महावितरण व प्रशासकीय अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून दिले आहेत. नागरिक आणि शेतकऱ्यांची गैरसोय लक्षात घेऊन पालकमंत्र्यांनी या प्रश्नात थेट हस्तक्षेप केल्याने परिसरातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

लोणीमावळा व वडझिरे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या गंभीर प्रश्नाची दखल घेत आमदार काशिनाथ दाते सर, भाजपचे राज्य परिषद सदस्य विश्वनाथ दादा कोरडे, निघोज गटाचे नेते सचिन वराळ पाटील, राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखिले आणि लोणीमावळा सोसायटीचे चेअरमन स्वप्निल मावळे यांनी पुढाकार घेत पालकमंत्र्यांशी संपर्क साधला. त्यांनी परिसरातील वीजपुरवठ्याची समस्या मांडत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

या मागणीची गांभीर्याने दखल घेत पालकमंत्र्यांनी कोणताही विलंब न करता संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून सूचना देत लोणीमावळा व वडझिरे परिसरातील वीजपुरवठा प्राधान्याने सुरळीत करण्याचे आदेश दिले. त्यामुळे महावितरण प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या समस्येसाठी दाखवलेली तत्परता आणि पालकमंत्र्यांनी घेतलेला सकारात्मक निर्णय यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत असून वीजपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत होण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *