पारनेर / भगवान गायकवाड, 

पारनेर शहर आणि परिसरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, आता चोरांनी आपला मोर्चा शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या साहित्याकडे वळवला आहे. पारनेर शहर परिसरातील विधाटे वस्ती जवळ असलेल्या बाळासाहेब गायकवाड या शेतकऱ्याच्या विहिरीवरील बोअरची वायर आणि महत्त्वाची अवजारे चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

       पारनेर शहर परिसरातील विधाटे वस्ती जवळील परिसरात शेतकरी बाळासाहेब गायकवाड यांची शेती आहे. गुरुवारी (दि. १) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास गायकवाड सायंकाळी ४ वाजेपर्यंत शेतात काम करत होते शेतातील काम उरकल्यानंतर घरी निघून गेले.त्या नंतर सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या विहिरी वरील पन्नास फुटी वायर आणि शेती अवजारे वर डल्ला मारला. चोरट्याने विहिरीवर असलेल्या बोअरची सुमारे ५० फूट लांबीची वायर आणि शेतीकामासाठी वापरली जाणारी कुऱ्हाड चोरून नेली.

नेहमीप्रमाणे शेतात फेरफटका मारताना आणि पाणी उपसा करण्यासाठी गेलेल्या गायकवाड यांच्या ही चोरी लक्षात आली. अचानक वायर गायब झाल्याने त्यांचे शेतीचे कामकाज विस्कळीत झाले आहे.गायकवाड यांनी परिसरातील सुरक्षेसाठी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता, चोरीचा हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसून आले आहे. या फुटेजमध्ये चोरटा चोरी करताना स्पष्टपणे दिसत असून, या पुराव्यामुळे चोरट्याचा शोध घेणे आता पोलिसांसमोर सोपे होणार आहे. सायंकाळच्या वेळी अशा प्रकारे चोरी झाल्यामुळे शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे.

शेतीचा हंगाम सुरू असताना विहिरीवरील मोटार किंवा बोअरची वायर चोरीला जाणे ही शेतकऱ्यासाठी मोठी आर्थिक आणि मानसिक हानी असते. एका बाजूला विजेचा लपंडाव आणि दुसऱ्या बाजूला साहित्याची चोरी यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. पन्नास फुटी वायरची किंमत हजारोंच्या घरात असून, ती पुन्हा बसवण्यासाठी शेतकऱ्याला मोठा खर्च करावा लागणार आहे.

पारनेर शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शेतातील अवजारे, वीज पंप, वायर आणि पाइप चोरणारी टोळी सक्रिय असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, पारनेर परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतीपंपाच्या साहित्याची काळजी घ्यावी, रात्रीच्या वेळी विहिरींवर किंवा गोठ्यात लक्ष ठेवावे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

या प्रकरणी पोलीस प्रशासन काय पावले उचलतात आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याला कधी गजाआड करतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *