धोत्रे येथे २२० के.व्ही. उपकेंद्राला गती : बाभुळवाडा ट्रान्सफॉर्मर क्षमतावाढीचे तातडीचे आदेश 


पारनेर / ता. प्रतिनिधी, 

मंगळवार दि. १२ मे २०२६
पारनेरच्या वीज प्रश्नांवर मुंबईत उच्चस्तरीय बैठक पारनेर तालुक्यातील वाढत्या वीज समस्यांबाबत आमदार काशिनाथ दाते सरांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी महापारेषण संचालक सतीश चव्हाण, कार्यकारी संचालक धनंजय औडेकर, अधिक्षक अभियंता प्लॉनिंग दाभरडे, कार्यकारी अभियंता योगेश चव्हाण उपस्थित होते. बैठकीत पारनेर तालुक्यातील कमी दाबाचा वीजपुरवठा, लांब पल्ल्याच्या ३३ के.व्ही. वाहिन्या, अपुरी ट्रान्सफॉर्मर क्षमता तसेच नवीन उपकेंद्र उभारणी या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

पारनेर तालुक्यात सध्या सुपा व बाभुळवाडा येथे १३२ के.व्ही. उपकेंद्र असून, केडगाव (जि. अहिल्यानगर), शिरूर व आळेफाटा (जि. पुणे) येथूनही विविध ३३/११ के.व्ही. उपकेंद्रांना वीजपुरवठा केला जात आहे. मात्र अनेक वाहिन्यांची लांबी ४० ते ५० किलोमीटरपर्यंत असल्याने कमी दाबाने वीजपुरवठा, वारंवार तांत्रिक बिघाड आणि दुरुस्तीसाठी होणारा विलंब यामुळे ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे आमदार दाते यांच्या माध्यमातून बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आले.


आळेफाटा येथून येणाऱ्या ३३ के.व्ही. वाहिनीवर अळकुटी, आणे, पळसपूर व वारणवाडी अशी चार उपकेंद्रे जोडलेली असून या वाहिनीची लांबी तब्बल ५० कि.मी. आहे. तसेच बाभुळवाडा येथून निघणाऱ्या सहा वाहिन्यांवर कान्हूर पठार, टाकळी ढोकेश्वर व निघोज परिसरातील प्रत्येकी दोन उपकेंद्रे जोडलेली आहेत. केडगाव येथून येणाऱ्या वाहिनीवर भाळवणी, गोरेगाव व ढवळपुरी ही उपकेंद्रे जोडलेली असून वाहिन्यांचे अंतर जास्त असल्याने वारंवार अडचणी निर्माण होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

वडगाव सावताळ – वनकुटे परिसरातील नवीन सबस्टेशनच्या मागणीबाबतही सकारात्मक चर्चा झाली. संबंधित प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना देत त्यावर लवकरच कार्यवाही केली जाईल, असा विश्वास मंत्री बोर्डीकर यांनी व्यक्त केला तर खडकवाडी व अळकुटी येथे नवीन सेक्शनच्या मागणीवर ग्राहकसंख्येचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, बाभुळवाडा येथील १३२ के.व्ही. उपकेंद्रात सध्या कार्यरत असलेल्या २५ MVA क्षमतेच्या दोन पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवून प्रत्येकी ५० MVA करण्यास मंजुरी मिळालेली असून त्याची अंमलबजावणी रखडल्याचे बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आले. यावर मंत्री बोर्डीकर यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

तसेच RDSS योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये होत असलेल्या दिरंगाईवरही नाराजी व्यक्त करत संबंधित ठेकेदारांना कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून या बैठकीमुळे पारनेर तालुक्यातील दीर्घकालीन वीज समस्यांच्या निराकरणाला गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
 धोत्रे येथे मंजूर असलेल्या नवीन २२० के.व्ही. उपकेंद्र तातडीने उभारणीची आवश्यकता आहे, हे उपकेंद्र लवकरात लवकर कार्यान्वित झाल्यास प्रत्येक ३३/११ के.व्ही. उपकेंद्राला स्वतंत्र वाहिनीद्वारे वीजपुरवठा करणे शक्य होणार असून कमी दाब, वारंवार खंडित होणारा पुरवठा व तांत्रिक बिघाडाच्या समस्यांपासून मोठा दिलासा मिळणार असल्याचे ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांचे निदर्शनास आणून दिल्याने मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना धोत्रे येथील प्रस्तावित उपकेंद्राचे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक बदल करून तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहे. 

– आ. काशिनाथ दाते सर (विधानसभा सदस्य)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *