अखिल भारतीय ग्राहक पंचायतचा जिल्हास्तरीय अभ्यास वर्ग संपन्न

पारनेर / भगवान गायकवाड, 

      विविध सामाजिक संघटनांमध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी समाजात काम करत असताना निस्वार्थ भावना आणि नैतिक मूल्यांची जपणूक करण्याचा मोलाचा सल्ला पद्मभूषण डॉ. अण्णासाहेब हजारे यांनी दिला. त्यांनी स्पष्ट केले की, सामाजिक कार्य करत असताना संघटनेच्या कार्यकर्त्यांचे शुद्ध विचार, शुद्ध आचार आणि जीवन निष्कलंक असणे अत्यंत आवश्यक आहे. केवळ भाषण देणे हा दोष नसून, भाषण देणाऱ्याच्या अंगी निष्कलंक जीवन, अपमान पचवण्याची शक्ती यांसारखे गुण आत्मसात करणे गरजेचे आहे.अण्णा हजारे यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत (मध्य महाराष्ट्र प्रांत) आयोजित जिल्हास्तरीय एकदिवसीय अभ्यास वर्गामध्ये मार्गदर्शन करताना हा मोलाचा सल्ला दिला. 

        मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच दीपप्रज्वलित करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. हा अभ्यास वर्ग राळेगण सिद्धी येथे पार पडला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य अन्न आयोग, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबईचे अध्यक्ष महेश ढवळे यांची उपस्थिती होती. तसेच, मध्य महाराष्ट्र प्रांताचे प्रांताध्यक्ष बाळासाहेब औटी, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य धनंजय गायकवाड, प्रांत संघटक संदीप जंगम, प्रांत कोषाध्यक्ष विलास जगदाळे, प्रांत सदस्य अतुल कुऱ्हाडे, पुणे जिल्हाध्यक्ष ॲड तुषार झेंडे, जिल्हाध्यक्ष शाहूराव औटी, महिला जिल्हाध्यक्षा अमिता कोहली, जिल्हा सचिव दिनेश थोरात, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश राहणे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक शेवाळे, पारनेर तालुकाध्यक्ष शहाजी पांढरे, महिला तालुकाप्रमुख सुनीता पवार आदींनी कार्यक्रमास उपस्थिती लावली.

       आपल्या भाषणात डॉ. अण्णासाहेब हजारे यांनी सामाजिक कार्याचा अर्थ समजावून सांगितला. ते म्हणाले की, सामाजिक काम करत असताना मान-अपमान सहन करावा लागतो. त्यामुळे प्रत्येक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अपमान सहन करण्याची सहनशक्ती असायला हवी.सत्याच्या मार्गावर चालणे आवश्यक आहे, यावर त्यांनी जोर दिला. त्यांनी आपल्या स्वतःच्या कार्याचा अनुभव सांगताना नमूद केले की, केवळ त्यांच्या शुद्ध व निष्कलंक कार्यामुळेच माहितीचा अधिकार यशस्वीरित्या राबवता आला आणि त्या माध्यमातून दहा महत्त्वाचे कायदे देशासाठी करता आले. हेच सामाजिक कार्याचे खरे यश आहे, असे त्यांनी सांगितले.

ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना अण्णा हजारे म्हणाले की, जर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आचार, विचार आणि निष्कलंक जीवन या तत्त्वांचे पालन करत सामाजिक कार्य केले, तर गाव, शहर, जिल्हा आणि संपूर्ण देशाचा विकास साधणे शक्य होईल. कार्यकर्त्यांनी स्वार्थाचा विचार न करता निस्वार्थ भावनेने काम करावे आणि नैतिक मूल्यांची कास धरावी, असे आवाहन त्यांनी केले.

या अभ्यास वर्गामुळे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांना सामाजिक कार्याची दिशा आणि नैतिक मूल्यांची जाणीव अधिक स्पष्ट झाली. या मार्गदर्शनपर अभ्यास वर्गाचा समारोप उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या कृतज्ञता व्यक्त करून करण्यात आला.

सुत्रांसंचलन अमिता कोहली यांनी केले तर आभार दिनेश थोरात यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *