पारनेर / भगवान गायकवाड,
जागतिक योग दिनाचे औचित्य साधत, पारनेर शहरातील वरखेड मळा परिसरातील कष्टकरी शेतकरी महिलांनी एक आगळावेगळा उपक्रम राबविला. शेतीच्या कामात अहोरात्र राबणाऱ्या या महिलांनी केवळ घरात किंवा हॉलमध्ये न थांबता, आपल्या कार्यक्षेत्रात एकत्र येऊन जागतिक योग दिन अतिशय उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमात परिसरातील मनिषा मगर, कविता मगर, हिराबाई मगर, बी के साधना दिदी, सविता परभणे, वैशाली औटी, जया औटी, नेहा औटी, सुप्रभा औटी, पौर्णिमा औटी, रुपाली औटी, रोहिणी औटी, अश्विनी औटी, सुनीता औटी, वैशाली औटी, प्रियांका औटी, सुप्रिया मगर, रंजना लोंढे, गायत्री मगर आदी शेतकरी महिलांनी सहभाग घेतला होता.
यावेळी योग प्रशिक्षक मीरा पुजारी यांनी महिलांना योगासनांचे महत्त्व समजावून सांगितले. शेतीची कामे करताना शरीराची होणारी झीज आणि थकवा दूर करण्यासाठी नियमित योगाभ्यास किती गरजेचा आहे, याचे मार्गदर्शन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वांनी सामूहिक प्रार्थना केली. त्यानंतर प्रशिक्षक मिरा पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी ताडासन, वृक्षासन, भुजंगासन आणि प्राणायामाचा सराव केला. दिवसभर शेतात काबाडकष्ट करणाऱ्या या महिलांच्या चेहऱ्यावर योगासनांमुळे एक वेगळाच उत्साह आणि प्रसन्नता दिसून येत होती.
या उपक्रमाबाबत बोलताना मनिषा मगर या महिला शेतकरी म्हणाल्या की, “आम्ही दिवसभर रानात काम करतो, त्यामुळे शरीराला व्यायामाची नितांत गरज असते. मिरा ताईंनी आम्हाला अतिशय सोपी आणि प्रभावी आसने शिकवली आहेत, ज्यामुळे आम्हाला कामाचा ताण हलका झाल्यासारखा वाटतोय.”
योग प्रशिक्षक मिरा पुजारी यांनी उपस्थितांना दैनंदिन जीवनात योगासनांचा समावेश करण्याचा संकल्प करायला लावला. “शरीर तंदुरुस्त असेल तरच शेती आणि घर नीट सांभाळता येते,” असे त्यांनी यावेळी सांगितले.
शेतात राबणाऱ्या हातांनी आरोग्यासाठी घेतलेला हा पुढाकार पारनेर परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. ग्रामीण भागातील महिलांना योगाच्या माध्यमातून सक्षम करण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरला असून, या कार्यक्रमामुळे महिलांमध्ये आरोग्याबाबत मोठी जागरूकता निर्माण झाली आहे. या आगळ्यावेगळ्या योग दिनामुळे वरखेड मळा परिसर उत्साहाने भारावून गेला होता.




