पारनेर / भगवान गायकवाड,
राज्यामध्ये १५ जूनपासून शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा झाला असून, पारनेर तालुक्यातील करंदी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळा परिसर न्हाऊन निघाला होता. या आनंददायी वातावरणातच शाळेला मिळालेल्या ‘तालुकास्तरीय शाळा गौरव पुरस्कारा’चा विशेष सन्मान सोहळा पार पडला.
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी प्रवेश केल्यावर त्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात एका वेगळ्या उत्साहात झाल्याने विद्यार्थीही हरखून गेले होते. याच निमित्ताने आयोजित छोटेखानी कार्यक्रमात शाळेचा नुकताच प्राप्त झालेला तालुकास्तरीय पुरस्कार हा ग्रामस्थांसाठी अभिमानाचा विषय ठरला.
कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा संजनाताई उघाडे, करंदी गावचे सरपंच भास्कर गव्हाणे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य संतोष मोहिते, युवा नेते लखन ठाणगे, उपाध्यक्ष शिवाजी ठाणगे, वि.का.सो.चे चेअरमन बबन चौधरी, युवा नेते विलास उघाडे व सलीम इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना मान्यवरांनी शाळेचे मुख्याध्यापक रोकडे सर, थोरात सर, सुंबे सर आणि घुले मॅडम यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. केवळ अध्यापनच नव्हे, तर शिक्षकांच्या अथक परिश्रमामुळे शाळेचा सर्वांगीण विकास साधला गेला आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि जिद्दीमुळेच आज करंदीची शाळा तालुका स्तरावर नावारूपास आली असून, तिला मानाचा पुरस्कार मिळाला आहे, अशा शब्दांत शिक्षकांचे कौतुक करण्यात आले.
यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी आपल्या मनोगतातून शालेय प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. “मराठी शाळांचे बळकटीकरण आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास ही काळाची गरज आहे,” असे मत सरपंच भास्कर गव्हाणे यांनी व्यक्त केले. तसेच, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी लागणारी सर्व प्रकारची मदत आणि सहकार्य ग्रामस्थ सदैव करतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. शिक्षकांनी याच जिद्दीने आणि जोमाने कार्य सुरू ठेवावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन शालेय समितीच्या वतीने करण्यात आले. शाळेच्या या उत्सवी वातावरणाने विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यातील नाते अधिक दृढ झाले असून, एका नव्या शैक्षणिक उमेदीने करंदी शाळा सज्ज झाली आहे.




