पारनेर पोलिसांचा १२ तासांच्या आत प्रकरणाचा उलगडा; १३ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त

पारनेर I प्रतिनिधी, 

पारनेर तालुक्यातील मांडवे परिसरात पिकअप वाहन अडवून कोयत्याचा धाक दाखवत ३ लाख ४१ हजार रुपयांची रोकड आणि मोबाईल लुटल्याच्या कथित घटनेचा पारनेर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत उलगडा केला आहे. या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे, लुटमारीची तक्रार देणारा फिर्यादीच या गुन्ह्याचा सूत्रधार असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक करून १० लाख रुपये किमतीची मारुती एर्टिगा कार, ३ लाख ४१ हजार रुपये रोख आणि २० हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण १३ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दि. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी मांडवे, ता. पारनेर येथील घाटातून पिकअप वाहनाने जात असताना तीन अज्ञात व्यक्तींनी इनोव्हा कार आडवी लावून वाहन अडवले. त्यानंतर कोयत्याचा धाक दाखवून कोंबड्या विक्रीतून मिळालेले ३ लाख ४१ हजार रुपये तसेच फिर्यादी आणि साक्षीदाराचा मोबाईल घेऊन आरोपी पसार झाल्याची तक्रार पारनेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १८४५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(६), १२६ आणि ३(५) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी गुन्हे शोध पथकाला तातडीने तपासासाठी रवाना केले. पोलिसांनी गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तसेच तांत्रिक तपासाच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू केला. या तपासादरम्यान दोन आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीत या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपासात ही लुटमार फिर्यादी याच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तिघांनाही अटक केली.

या कारवाईत पोलिसांनी १० लाख रुपये किमतीची मारुती एर्टिगा कार (क्रमांक MH-16-AT-4835), फिर्यादीची ३ लाख ४१ हजार रुपयांची रोख रक्कम आणि साक्षीदाराचा २० हजार रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल असा एकूण १३ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्यातील चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या १२ तासांच्या आत प्रकरणाचा उलगडा करण्यात पारनेर पोलिसांना यश आले आहे.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकात सफौ पोपट रोकडे, गणेश डहाळे, पोहेकॉ अमोल धामणे, पोहेकॉ कल्याण लगड, पोलीस कॉन्स्टेबल गणेश डोंगरे, सारंग वाघ तसेच दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडु आणि अरुण सांगळे यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास सफौ पोपट रोकडे करीत आहेत. पारनेर पोलिसांनी केलेल्या या जलद कारवाईमुळे कथित लुटमारीच्या प्रकरणामागील सत्य उघड झाले असून, तपासातील तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *