महीला व सर्वसामान्य लाभार्थ्यांना सहकार्य करा : आमदार काशिनाथ दाते सर


पारनेर/ प्रतिनिधी,
 दिनांक २४ जुलै २०२५ रोजी पारनेर शहरातील गणेश मंगल कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान मोठ्या उत्साहात आणि जनसहभागातून पार पडले. या शिबिराचे उद्घाटन पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार काशिनाथ दाते सर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार दाते म्हणाले की, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना सातत्याने अडचणी येत असल्या तरी संबंधित लाभाच्या रकमा डिबीटी द्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येत असल्याने त्यामध्ये येणाऱ्या अडचणींची चौकशी ऑनलाईन पद्धतीने करावी लागते, परीणामी लाभार्थ्यांची गैरसोय होत असल्याची जाणीव असुन त्यात लवकरच सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जाईल.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, शासन स्तरावर सर्वसामान्यांच्या हिताच्या विविध योजना राबविण्यात येत असुन शासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांची भुमिका ही केवळ वाढप्याची भुमिका आहे ती सर्वांनी योग्य व जबाबदारीने बजावत तालुक्यातील जास्तीत जास्त नागरीकांना लाभ सुलभतेने मिळवून देण्यात यावा. . या अभियानाच्या माध्यमातून पारनेर महसूल मंडलातील नागरिकांना शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची माहिती, मार्गदर्शन व थेट लाभ देण्याचे कार्य करण्यात आले. एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा आणि योजनांची सोय उपलब्ध करून दिली गेली होती. यामुळे सामान्य नागरिकांना अनेक योजनांचा लाभ मिळवणे अधिक सुलभ झाले.

यावेळी पंचायत समिती कृषी विभागाच्या जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत कडबाकुट्टी व बायोगॅस, पशुसंवर्धन विभागाच्या वतीने गाय व शेळी गट वाटप, घरकुल योजना अनुदान, महिला बचत गटांना बँकेमार्फत कर्ज वाटप, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत गरोदर मातांना बेबी केअर कीट व घरपोच आहार, आरोग्य विभागाच्या वतीने प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महसूल विभागाच्या वतीने शैक्षणिक कामकाजासाठी आवश्यक असलेले विविध दाखले, रेशनकार्ड ऑनलाईन करणे, रेशन कार्डातील नाव कमी करणे, श्रावणबाळ योजना, वनविभागाच्या वतीने वन्य प्राण्यांनी केलेल्या पशुधन नुकसानीचे लाभ, नगर पंचायतच्या माध्यमातून कार्यक्षेत्रांतर्गत प्रधानमंत्री आवास योजना, तालुका कृषी विभागाच्या मार्फत शेती औजारे, कडधान्य प्रक्रिया उद्योग व अपघात सानुग्रह अनुदान, परिवहन विभागाच्या वतीने शालेय विद्यार्थिनीना अहिल्याबाई होळकर लाभार्थी मोफत पास तर भूमी अभिलेख कार्यालयीन कामांसाठी मार्गदर्शन व उपस्थित लाभार्थ्यांना आमदार महोदयांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभाच्या पत्रांचे वितरण करण्यात आले.       

लाभार्थी व प्रशासन यांच्यातील सुसंवाद वृद्धिंगत करण्याचे संकल्पनाधिष्ठित उद्दिष्ट घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमासाठी भाजपाच्या राज्य परिषदेचे सदस्य विश्वनाथ कोरडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर, सखाराम औटी, तहसीलदार गायत्री सौंदाणे तसेच शासनाच्या आरोग्य, नगरपंचायत, महावितरण, राज्य परिवहन, कृषी, भुमी अभिलेख, महीला बालकल्याण, संजय गांधी योजना, पुरवठा आदी विभागांचे अधिकारी व स्थानिक नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमातून पारनेर तालुक्यातील जनतेमध्ये शासकीय योजनांविषयी जागरूकता वाढली असून, नागरिकांचा शासनावरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. “सुशासनाच्या दिशेने एक गतिमान पाऊल” ठरलेले हे शिबीर यशस्वी होण्यासाठी आमदार काशिनाथ दाते सर यांनी विशेष प्रयत्न केले आणि स्थानिक पातळीवर शासन-जनतेत समन्वय घडवून आणण्याचे महत्त्वपूर्ण काम केले.

🔶🔶🔶🔶🔶🔶
 तहसील कार्यालयात विवीध रिक्त पदांवर नविन नियुक्त्या झाल्या असून उर्वरित जागांसाठी लवकरच आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येणार असल्याने तहसील कार्यालयाकडून वारंवार अपुऱ्या मनुष्यबळाची केली जाणारी तक्रार दुर होणार आहे त्यामुळे तालुक्यातील सर्वसामान्य नागरीक व विशेषतः महीलांच्या तक्रारी येणार नाहीत ह्याची सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी. -आमदार काशिनाथ दाते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *